मुंबई : परवडणारी घरे बांधणाऱ्या म्हाडाने १० आॅगस्ट रोजी तब्बल ९७२ घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी घरांच्या किमती वाढलेल्या आहेत. सर्वांत कमी किमतीचे घर अत्यल्प उत्पन्न गटात मालवणी मालाडमध्ये आहे. तर सर्वाधिक महाग घर दहिसरच्या शैलेंद्र नगरमध्ये आहे. म्हाडाच्या सोडतीची घरे मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात आहे. म्हाडाच्या सोडतीच्या घरांसाठी २३ जून ते २३ जुलै यावेळेत नोंदणी करता येईल. २४ जून ते २५ जुलै याकाळात आॅनलाईन अर्ज दाखल करता येतील. आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २५ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत आहे. तर अॅक्सिस बँकेत डीडी भरण्याचा कालावधी २४ जून ते २७ जूलै असा आहे. घरांची सोडत १० आॅगस्ट रोजी काढण्यात येईल. म्हाडाच्या ९७२ घरांपैकी ४७७ घरे खुल्या गटासाठी उपलब्ध आहे. उच्च उत्पन्न गटातील सर्वात महागडी घरे दहिसरमधील शैलेंद्र नगर येथे आहेत; आणि त्यांची किंमत ८३ लाख ८६ हजार एवढी आहे. तर अत्यल्प उत्पन्न गटातील सर्वात स्वस्त घरे मालाड-मालवणी येथे असून, त्या घरांची किंमत ८ लाख १७ हजार एवढी आहे. (प्रतिनिधी)अत्यल्प उत्पन्न गटासाठी चांदिवली, गोरेगाव, प्रतीक्षा नगर, मानखुर्द, मालाड, कुर्ला, बोरीवली आणि पवई येथे घरे आहेत.अल्प उत्पन्न गटासाठी गोरेगाव, मुलुंड, कुर्ला, मालाड, कांदिवली, मानखुर्द, जोगेश्वरी, दिंडोशी, सायन, चेंबूर आणि गोरेगाव येथे घरे आहेत.मध्यम उत्पन्न गटासाठी गोरेगाव, बोरीवली, चांदिवली, चेंबूर, मालाड, सायन, दहिसर, कुर्ला, बोरीवली आणि सायन येथे घरे आहेत.उच्च उत्पन्न गटासाठी पवई, वर्सोवा, अंधेरी, कांदिवली, दहिसर, बोरीवली आणि सांताक्रूझ येथे घरे आहेत.१ आमदारांचे वैयक्तिक उत्पन वगळता केवळ शासनाकडून दर महिना विविध भत्यासह किमान ६० हजार रुपये मिळत असलेतरी गृहनिर्माण विभागाचा एक महत्वाचा भाग असलेल्या ‘म्हाडा’ला त्याची कल्पनाही नाही. त्याच्या लेखी अद्यापही काही आमदार वैयक्तिक व शासकीय वेतन-भत्यासहित महिन्याला जेमतेम २५ हजार रुपये कमावितात. त्यामुळे यंदाच्या म्हाडाच्या घराच्या लॉटरीमध्ये अत्यल्प उत्पन्न गटातही त्यांच्यासाठी घरे आरक्षित ठेवण्यात आली आहेत.२अत्यल्प,अल्प व मध्यम उत्पन्न या तीन गटात गेल्या कित्येक वर्षापासून आमदार-खासदारांकडून एकही अर्ज येत नाही. त्यामुळे ही घरे सोडतीविना तशीच पडून राहतात. ‘लोकमत’ने हा विषय मांडला होता. मात्र म्हाडा प्रशासनाने त्यात कोणताही बदल केलेला नाही. यावर्षीच्या सोडतीमध्ये टिळकनगर, चेंबूर येथील मध्य उत्पन्न गटासाठी असलेले एकमेव सदनिका आजी-माजी लोकप्रतिनिधीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. याठिकाणी अन्य कोणाला अर्जही करता येणार नाही. तसेच मानखुर्दमधील अल्प उत्पन्न गटाच्या दोन घरांपैकी एक लोकप्रतिनिधीसाठी राखीव आहे.
म्हाडाची ९७२ घरांसाठी सोडत
By admin | Published: June 23, 2016 4:58 AM