- मनोहर कुंभेजकर
मुंबई : नवसाला पावणारा आणि दरवर्षी संकष्टी चतुर्थीला विसर्जन होणारा गणपती अशी ख्याती असलेल्या अंधेरीच्या राजाला आज चक्क एका गणेश भक्ताने 912 किलो मोतीचूर बुंदीचे लाडू अर्पण केले आहेत. अंधेरी पश्चिम येथील आझाद नगर मेट्रो स्थानकापासून जवळ असलेल्या येथील आझाद नगर 2 येथील मैदानात अंधेरीचा राजा अष्टविनायकापैकी एक असलेल्या थेऊरच्या गणपती मंदिराच्या हुबेहूब प्रतिकृतीत विराजमान झाला आहे.
पहिल्या दिवसापासूनच येथे अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला गणेश भक्त आणि सेलिब्रेटी यांची गर्दी झाली आहे. दरवर्षी संकष्टी चतुर्थीला विसर्जन अंधेरीच्या राजाचे दर्शन घेतल्यावर गणेश भक्त उपवास सोडतात. येत्या संकष्टी चतुर्थीला दि. 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता अंधेरीच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक निघणार आहे.
सुमारे 19 ते 20 तासांच्या मिरवणुकीनंतर येत्या 29 सप्टेंबर रोजी दुपारी 2 च्या सुमारास वेसावे समुद्रकिनारी येथील माजी नगरसेवक मोतीराम भावे यांच्या कुटुंबीयाने पूजा करण्यात येईल. त्यानंतर अंधेरीच्या राजाला येथील हजारो गणेश भक्तांच्या उपस्थितीत मांडवी गल्ली कोळी जमातीचे कार्यकर्ते खास शिपीलच्या(छोट्या बोटी) तराफ्यावरून वेसावे येथील खोल समुद्रात विसर्जन करणार असल्याची माहिती पालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष व आझादनगर सार्वजनिक उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक यशोधर(शैलेश)फणसे व खजिनदार सुबोध चिटणीस यांनी दिली.