घाटकोपर येथील ९२ वर्षांच्या आजीने केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 04:44 AM2020-06-05T04:44:29+5:302020-06-05T06:56:07+5:30
करोनामुक्त झालेल्या या आजींना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला. डॉक्टर, परिचारिका आणि मेडिकल स्टाफ यांनी योग्य प्रकारे आजींवर उपचार केले.
मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्णही बरे होत आहेत. त्यातच गुरुवारी घाटकोपरच्या रहिवासी असणाऱ्या ९२ वर्षांच्या आजीने कोरोनावर मात केली आहे. करोनामुक्त झालेल्या या आजींना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला.
डॉक्टर, परिचारिका आणि मेडिकल स्टाफ यांनी योग्य प्रकारे आजींवर उपचार केले. आणि आता या आजी कोरोनामुक्त झाल्या आहेत. या आजींना डिस्चार्ज देताना, सर्व मेडिकल स्टाफ उपस्थित होता. सर्वांनी टाळ्या वाजवून आजींचे अभिनंदन केले. आजींना अचानक खोकला, ताप तसेच श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, एकंदर लक्षणे पाहून कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला म्हणून त्यांना कोहिनूर रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले.
आजींच्या घरातील त्यांच्या दोन केअरटेकरपैकी एकाला कोरोनाची लागण झाली आणि काही दिवसांनी आजींनाही लक्षणे दिसायला लागली, अशी माहिती त्यांचा नातू गौरव मथुरावाला यांनी दिली. आजींनी दाखवलेल्या हिमतीमुळे आणि त्या उपचाराला साथ देत होत्या त्यामुळेच त्या लवकर ब-या झाल्या, असे डॉ. चेतन वेलांनी यांनी सांगितले.