ठाणे : काही नागरीकांच्या बेजाबदारपणामुळे आणि पालिकेच्या हलगर्जीपणामुळे लोकमान्य नगर भागातील घटनेमुळे अख्खे लोकमान्यनगर बंद ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे आता पालिकेचा आणखी एक निष्काळजीपणा समोर आला आहे. भाईंदर पाडा येथील विलीगकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या एका ९२ वर्षीय वृध्द महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले जाईल असे सांगितले जात होते. परंतु तिला येथून घेण्यासाठी किंवा, अॅब्युलेन्सही घेऊन कोणी आले नाही, त्यामुळे तिच्या मुलाचा आणि सुनेचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. कोणी येत नसल्याने अखेर मुलाने माझ्या पत्नीने १३ व्या मजल्यावरुन चालत खाली आणले. तरीसुध्दा त्याला तब्बल तीन तास अब्युलेन्स आली नाही. अखेर याबाबतचे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्यानंतर प्रशासनाने अब्युलेन्स आली आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही घटना पालिकेतील एका वरीष्ठ कर्मचाऱ्याच्या बाबतीत घडली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरीकांनी काय करायचे, यामुळे कोराना वाढणार की कमी होणार असा सवाल उपस्थित झाला आहे. ठाणे महापालिकेतील परवाना विभागातील एका वरीष्ठ कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याच्यावर आता जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परंतु त्याच्या संपर्कात आलेल्या मुलगी आणि सुनेचाही रिपोर्ट पॉझीटीव्ह आला. त्यांना घोडबंदर भागातील भार्इंदरपाडा येथे ठेवण्यात आले आहे. त्यांना वेगळे ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दुसरीकडे आता संबधींत कर्मचाºयाच्या ९२ वर्षीय त्यांच्या आईला देखील कोरोनाची लागण झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानुसार बुधवारी सकाळी त्यांना नाष्टा करुन तयार राहण्यास सांगण्यात आले होते. परंतु दुपारी १ वाजेपर्यंत पालिका प्रशासनातील एकाही कर्मचारी अथवा डॉक्टरांनी येथे फेरी मारली नाही. त्यानंतर तब्बल १३ व्या मजल्यावरुन या वृध्द महिलेला चालता येत नसतांनाही त्यांच्या नातवाईने आणि सुनेने चालत खाली आणले. या दोघांचे रिपोर्ट निगेटीव्ह आहेत, परंतु पालिकेकडून अशा पध्दतीने हलगर्जीपणा होत असल्याने आता या दोघांनाही त्याची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तीन तास थांबल्यानंतर पालिकेडून अॅब्युलेन्सची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर सदर वृध्द महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. परंतु पालिका प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराचा हा फटका आता पालिकेच्याच एका वरीष्ठ कर्मचाऱ्याला कसा बसला आहे, हे आता समोर आले आहे. पालिकेडून वेळीच दखल घेणे अपेक्षित असतांना ती घेतली जात नसल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. एका पालिकेच्या कर्मचाऱ्याला ही वागणूक दिली जात असेल तर इतर सर्वसामान्यांचे किती हाल होत असतील याचा विचारच न केलेला बरा असेही आता बोलले जात आहे. पालिकेच्या या किरकोळ चुकांमुळे आता त्याचे भोग आणखी किती जणांना भोगावे लागणार हे आता येणारा काळच ठरविणार आहे.
९२ वर्षीय वृध्द महिला अॅब्युलेन्ससाठी ताटकळली तब्बल तीन तास, निगेटीव्ह अहवाल असल्यांनी अखेर १३ मजले उतरवून आणले खाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 5:45 PM