Join us

“साहेब जाणार नाय त्याच्याकडे माफी मागायला”; फायर आज्जींनी सांगितलं ‘झुकेगा नहीं’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 6:32 PM

उद्धवसाहेब तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. आम्ही सर्व शिवसैनिक तुमच्यासोबत आहोत, असे सांगायला मातोश्रीवर आले होते, असे चंद्रभागा आज्जी म्हणाल्या.

मुंबई: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेतील बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर तिसऱ्या दिवशी राजकीय हालचालींना प्रचंड वेग आल्याचे दिसत आहे. फेसबुक लाइव्ह केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) वर्षा बंगला सोडून मातोश्रीवर दाखल झाले. यातच आता कट्टर शिवसैनिक असलेल्या ९२ वर्षांच्या चंद्रभागा आज्जी उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातोश्रीवर आल्याचे सांगितले जात आहे. यावेळी चंद्रभागा आज्जींनी उद्धव ठाकरे यांना धीर दिला असून, बंडखोरांच्या या कृतीचा चांगलाच समाचार घेतला.

नवनीत राणांविरोधातील आंदोलनानंतर चर्चेत आलेल्या ९२ वर्षांच्या शिवसेनेच्या फायरब्रँड आज्जी चंद्रभागा शिंदे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे. आज्जी जवळपास तासभर मातोश्रीमध्ये होत्या. आजींना मुख्यमंत्री स्वतः भेटले की इतर कोणी? हे अद्याप समजलेले नाही. पण तासभर आजी मातोश्रीमध्ये होत्या, असे सांगितले जात आहेत. एकीकडे परभणीच्या खासदारांसह अन्य पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली असताना आजींना मात्र एन्ट्री मिळाली आहे. यावेळी मीडियाशी बोलताना चंद्रभागा आज्जींनी आपले मनोगत व्यक्त केले. 

साहेब जाणार नाय त्याच्याकडे माफी मागायला

साहेबांना सांगितले की, काळजी करू नका. आम्ही सर्व शिवसैनिक तुमच्यासोबत आहोत. रिक्षावाल्याला आमदार केले, मोठे केले. उद्धवसाहेब मातोश्रीवर आल्यानंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आले. साहेबांशी वार्ता केली. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, हे सांगण्यासाठी मातोश्रीवर आले. बाकी काही नाही, असे चंद्रभागा आज्जी म्हणाल्या. गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना परत आणण्याबाबत काय सांगाल, या प्रश्नावर बोलताना, तो परत येणार इथे माफी मागायला. साहेब जाणार नाय त्याच्याकडे माफी मागायला. साहेब रात्री मातोश्रीवर आले, तेव्हा मला अक्षरशः रडायला आले, अशा भावना चंद्रभागा आज्जींनी व्यक्त केल्या. तसेच काही झाले तरी उद्धवसाहेब राजीनामा देणार नाहीत, तेच राहणार. ते कट्टर शिवसैनिक असतील, तर परत येतील. नाहीतर गेलेले कट्टर नाहीत असे समजा, अशी रोखठोक भूमिका चंद्रभागा आज्जी यांनी मांडली.

दरम्यान, ९२ वर्षीय आज्जींचे नाव चंद्रभागा गणपत शिंदे आहे. मुंबईतील शिवडी येथील त्या रहिवासी आहेत. अजूनही शिवडी नाक्यावर भाजीचा व्यवसाय करतात. पोलिसदूत म्हणून विभागात काम करतात आणि पोलिसांनाही सामाजिक कामात मदत करतात. आज्जींना दोन मुले आणि दोन नातवंडे आहेत. आजींना विचारले की, तुम्ही केव्हापासून शिवसैनिक आहात, तर त्या बाळासाहेबांपासून शिवसैनिक असल्याचे सांगतात. तसेच आजींचे शिवसेनेसोबतचे नातेही खास आणि तितकेच सलोख्याचे होते. बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकांपैकी एक चंद्रभागा आज्जी एक आहेत.  

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाएकनाथ शिंदे