मुंबईत गॅस्ट्रोचे ९१६ रुग्ण आढळले
By admin | Published: May 8, 2017 06:51 AM2017-05-08T06:51:57+5:302017-05-08T06:51:57+5:30
पावसाळ्याच्या तोंडावर महापालिकेने नालेसफाईसह पावसाळ्याची उर्वरित कामे वेगाने हाती घेतली असली तरीदेखील आजारांबाबत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पावसाळ्याच्या तोंडावर महापालिकेने नालेसफाईसह पावसाळ्याची उर्वरित कामे वेगाने हाती घेतली असली तरीदेखील आजारांबाबत पालिका अद्यापही उदासीनच आहे. महत्त्वाचे म्हणजे ‘गॅस्ट्रो’ला थोपवण्याबाबत पालिकेचे प्रयत्न कमी पडले असून, फेरीवाल्यांकडील बर्फ व पाणी दूषित असल्याचे उजेडात आले. याचवेळी एप्रिल महिन्यात मुंबईत गॅस्ट्रोचे तब्बल ९१६ रुग्ण आढळून आले आहेत. परिणामी महापालिकेच्या आजारासंबंधीच्या कार्यवाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, गॅस्ट्रोला आळा घालण्यासाठी पालिका काय कारवाई करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पावसाळ्यात गॅस्ट्रो रुग्णांची संख्या वाढण्याचा धोका असल्याने या आजाराचे प्रसारक असलेल्या उघड्यावरील खाद्यपदार्थांच्या गाड्या हद्दपार होण्याचे संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार ३० मेपर्यंत पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने रस्त्याच्या कडेला अन्न शिजवणाऱ्या चारचाकी गाड्या हटवण्याचा निर्धार केला आहे. धकाधकीच्या जीवनात उसंत नसलेल्या मुंबईकरांची भूक रस्त्यावर शिजणारे अन्नपदार्थ भागवत असतात. मात्र दूषित पाणी आणि खाद्यांमुळे अतिसाराचे प्रमाण वाढू लागले आहे. गेल्याच आठवड्यात अनेक ठिकाणी केलेल्या पाहणीत बर्फ व पाणी दूषित असल्याचे उजेडात आले. त्यामुळे महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उघड्यावर अन्न शिजवणाऱ्या हातगाड्यांवर कारवाई सुरू आहे. ही कारवाई पुढील काही दिवसांमध्ये तीव्र करण्यात येणार आहे. दरम्यान, महापालिका क्षेत्रातील पेय पदार्थ व खाद्य पदार्थ विकणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यांविरोधातील सध्या सुरू असलेली मोहीम अधिक तीव्र करावी, असे आदेश शनिवारच्या बैठकीत देण्यात आले.