Join us

शहापुरात वादळी वाऱ्यात ९३ घरांचे नुकसान

By admin | Published: June 11, 2015 5:45 AM

शहापूर तालुक्यात सोमवारी आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने ९३ घरांचे मोठे नुकसान केले असून एक घर पूर्णपणे कोसळले आहे.

भातसानगर : शहापूर तालुक्यात सोमवारी आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने ९३ घरांचे मोठे नुकसान केले असून एक घर पूर्णपणे कोसळले आहे. यामध्ये जीवितहानी झाली नसून अनेक झाडे उन्मळून पडल्याने अनेक ठिकाणी वाहनांची रहदारी व वीजपुरवठा खंडीत झाला होता.दुपारी दोनच्या सुमारास आलेल्या पावसाबरोबरच वादळी वाऱ्याने घरांचे प्रचंड नुकसान केले. शहापूरात सर्वात अधिक घरांचे नुकसान झाले असून इमारती व घरांवरील पत्रे उडून गेले तर काही ठिकाणी कौले उडाली तर घरे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. वेहळोली परिसरात दोन म्हशी मृत्युमुखी पडल्या तर नांदगाव येथे एक पोल्ट्रीफार्म कोसळून शेकडो कोंबड्या मरण पावल्या. रस्त्यांवर झाडे उन्मळून पडल्याने शहापुरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. तर अनेक गावांतील वीजपुरवठाही खंडित झाला होता.शहापुरात २१ घरांचे ७ लाख ३२ हजार, सावरोली बु. २१ घरांचे ४ लाख ४ हजार ३५० रुपये, माहुली दोन घरांचे ५१ हजार ८५० रुपये, आवाळे १९ घरांचे २ लाख ४७ हजार ४९० रुपये, चांदरोटी १ घराचे ३१ हजार ६००, आसनगाव १३ घरांचे १८ लाख ८८ हजार ९०० रुपये, अघई १७ घरांचे ८८ हजार ६० रुपये असे एकूण ९२ घरांचे ३४ लाख ४४ हजार २५० रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आपत्कालीन व्यवस्थापनाने वर्तविला आहे. पिडीतांनी तातडीने भरपाईची मागणी केली आहे. (वार्ताहर)