आयटीआयमध्ये ९३ हजार प्रवेश, ५० हजारांहून अधिक जागा रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:07 AM2021-01-14T04:07:09+5:302021-01-14T04:07:09+5:30
पुरवणी परीक्षेतील विद्यार्थ्यांना १६ जानेवारीपर्यंत प्रवेशाची मुदत लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील दहावी पुरवणी परीक्षेतील जे विद्यार्थी आयटीआय ...
पुरवणी परीक्षेतील विद्यार्थ्यांना १६ जानेवारीपर्यंत प्रवेशाची मुदत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील दहावी पुरवणी परीक्षेतील जे विद्यार्थी आयटीआय प्रवेशासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी संस्थास्तरीय समुपदेशन फेरीला सुरुवात झाली असून, ही फेरी १६ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. यादरम्यान खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील संस्थास्तरीय प्रवेशही होणार आहेत. नोव्हेंबर-डिसेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले असतील आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेशास इच्छुक असतील अशा उमेदवारांना संचालनालयाच्या वतीने प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली. ही प्रक्रिया ८ जानेवारीपासून सुरू झाली असून, त्याआधी ७ जानेवारीपर्यंत राज्यात आयटीआयचे एकूण ९३ हजार ३१३ प्रवेश निश्चित झाले आहेत.
सद्य:स्थितीत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. राज्यात आयटीआय प्रवेशासाठी कॅप राऊंडच्या १ लाख ३२ हजार ९३१ आणि संस्थास्तरावरील, अल्पसंख्यांक जागा मिळून एकूण १ लाख ४६ हजार ५२ जागा उपलब्ध आहेत. यंदा पहिल्या कॅप राउंडमध्ये तब्बल ८८ हजार ६० विद्यार्थ्यांना अलॉटमेंट देण्यात आले. मात्र, त्यावेळी केवळ २६ हजार ८८१ विद्यार्थ्यांनी म्हणजेच केवळ ३० टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेशनिश्चिती केली. त्यानंतर मराठा आरक्षणाला देण्यात आलेल्या स्थगितीमुळे आयटीआय प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली आणि ५ डिसेंबर ते ८ डिसेंबरदरम्यान मराठा आरक्षण जागा वगळून दुसरा कॅप राउंड पार पडला. मात्र, त्यातही अनेक विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशाकडे पाठ फिरविल्याचे चित्र समोर आले. दुसऱ्या कॅप राउंडमध्ये केवळ १८.८० टक्के, तर तिसऱ्या कॅप राउंडमध्ये २०.८९ टक्के प्रवेश विद्यार्थ्यांनी निश्चित केले होते. त्यामुळे चार फेऱ्यांनंतर आयटीआयमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आतापर्यंतची संख्या केवळ ६५ हजार ४८३ इतकी होऊ शकली.
त्यांनतर संस्थास्तरीय समुपदेशन फेरीमध्ये खाजगी आयटीआयमध्ये ४१ टक्के, तर शासकीय आयटीआयमध्ये १७ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदविला. त्यामुळे राज्यात आयटीआयच्या ५४ हजार जागा रिक्त आहेत. मात्र, दहावी पुरवणी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या संधीमुळे या एकूण संख्येत भर पडून रिक्त जागांची संख्या कमी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.