Join us

केंद्र सरकारकडून मुंबई विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाला ९४ लाखांचे अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 12:34 PM

विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाला संशोधन आणि अनुषंगिक पायाभूत सुविधा अद्ययावत करण्यासाठी हे अनुदान मिळाले आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या रसायनशास्त्र (स्वायत्त) विभागास केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून संशोधनासाठी ९४ लाखांचे अनुदान मिळाले आहे. विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाला संशोधन आणि अनुषंगिक पायाभूत सुविधा अद्ययावत करण्यासाठी हे अनुदान मिळाले आहे.

नॅनो टेक्नोलॉजी आणि मटेरिअल सायन्स या उदयोन्मुख क्षेत्रात अधिकाधिक संशोधनावर भर दिला जाणार असून याअंतर्गत एनर्जी स्टोरेज डिव्हाईसेस, ऑरगॅनिक लाइट एमिटिंग डायोड्स, सेमी कंडक्टर मटेरिअल्स, सेन्सर्स आणि पॉलिमर नॅनो कंपोझिट या विषयावर संखोल संशोधन केले जाणार असल्याचे विभागप्रमुख प्रा. शिवराम गर्जे यांनी सांगितले. 

 विभागास मिळालेल्या या अनुदानामुळे विभागातील संशोधन आणि विकासासाठी विद्यमान पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण करून संशोधनाला चालना देण्यावर अधिक भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. डीएसटी-फिस्ट अंतर्गत मंजूर होणाऱ्या अनुदानामुळे विद्यापीठ विभागातील संशोधन क्षमता, प्राध्यापक आणि संशोधकांच्या गुणवत्तेवर राष्ट्रीय मान्यतेची मोहोर उमटत असल्याने यास विशेष महत्व असते. उच्च शिक्षण संस्थामध्ये नवप्रतिभावंताना आकर्षित करण्यासाठी ५ वर्षांच्या कालावधीसाठी हे अनुदान दिले जाते.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ