गेल्या २४ तासांत ९४ नवीन इमारती सील, चेंबूरमध्ये चार इमारती प्रतिबंधित
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 09:56 PM2021-02-19T21:56:08+5:302021-02-19T21:56:21+5:30
गेल्या दोन आठवड्यांत मुलुंड, चेंबूर, अंधेरी पूर्व-जोगेश्वरी पूर्व, बोरिवलीमध्ये रुग्ण संख्या वाढली आहे. होम क्वारंटाइन असलेले बाधित व काही संशयित रुग्ण नियम मोडून घराबाहेर फिरत आहेत.
मुंबई - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यापुढे पाच बाधित रुग्ण आढळले तरी संपूर्ण इमारत सील करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. इमारत प्रतिबंधित केल्यानंतरही काही रहिवासी घराबाहेर पडत असल्याचे संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. त्यानुसार गेल्या २४ तासांत मुंबईतील तब्बल ९४ इमारती प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता ३२१ इमारती सील आहेत. यामध्ये चेंबूर येथील चार इमारतींचा समावेश आहे. परिणामी, येथील रहिवाशांना १४ दिवस इमारतीबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.
गेल्या दोन आठवड्यांत मुलुंड, चेंबूर, अंधेरी पूर्व-जोगेश्वरी पूर्व, बोरिवलीमध्ये रुग्ण संख्या वाढली आहे. होम क्वारंटाइन असलेले बाधित व काही संशयित रुग्ण नियम मोडून घराबाहेर फिरत आहेत. त्यामुळे महापालिकेने प्रतिबंधित इमारतींचे नियम कठोर केले आहेत. यापूर्वी बाधित रुग्ण सापडलेला मजलाच केवळ सील करण्यात येत होता. मात्र यापुढे पाच रुग्ण आढळले तरी संपूर्ण इमारत सील केली जाणार आहे. गुरुवारी २५७ इमारती सील होत्या. शुक्रवारी यामध्ये ९४ इमारतींची भर पडली आहे.
चेंबूर हॉटस्पॉट...
गेल्या आठ दिवसांत चेंबूरमध्ये कोरोना रुग्णांचा दररोजचा आकडा १५ वरून २९ वर गेल्यामुळे पालिकेने सुमारे ५५० इमारतींना क्वारंटाईनचे नियम पाळा नाही तर कारवाई करू, असा इशारा दिला होता. मात्र, रहिवाशांच्या मानसिकतेत काही बदल न झाल्यामुळे पाचपेक्षा जास्त रुग्णसंख्या असलेली चेंबूर, मैत्री पार्क येथील सफल हाईट, चेंबूर पोलीस ठाण्यासमोरील नवजीवन सोसायटी, सिंधी सोसायटी बंगलाे नं १३ मधील साई त्रिशूल आणि आरसी मार्ग मारवली गावाजवळ शिवधाम या इमारती सील करण्यात आल्या आहेत.
१४ दिवस बाहेर पडण्यास मनाई...
सील इमारतींमधील रहिवाशांना पुढील १४ दिवस इमारतींबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. १४ दिवसांनंतर या इमारतींमधील रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात येईल. संख्या कमी झाली तर सील उठवण्यात येणार आहे. मात्र, रुग्णसंख्या कमी झाली नाही तर इमारत सील राहणार आहे. त्यामुळे रहिवाशांना खाणे-पिणे, कामधंंदा, नोकरी आता वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून करावे लागणार आहे.