९,४०९ सदनिकाधारकांच्या शुल्कात कपात; बोळिंज वसाहतीतील रहिवाशांना मासिक सेवेबाबत दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 09:46 AM2024-10-13T09:46:07+5:302024-10-13T09:47:24+5:30
यामुळे विरार बोळिंज वसाहतीतील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे...
मुंबई : म्हाडा कोकण मंडळाच्या विरार बोळींज वसाहतीतील टप्पा क्रमांक १, २ व ३ मधील ९४०९ सदनिकाधारकांकडून आकारण्यात येणारे मासिक सेवाशुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे व म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार या प्रकल्पामध्ये ताबा घेतलेल्या सदनिकाधारकांचे यापूर्वीचे सेवाशुल्क कमी करण्यात आले आहे.. यामुळे विरार बोळिंज वसाहतीतील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.
या निर्णयानुसार अल्प उत्पन्न गटातील सदनिकाधारकांकडून प्रति महिना १,४५० रुपये आणि मध्यम उत्पन्न गटातील सदनिकाधारकांकडून प्रति महिना २,४०० रुपये सेवाशुल्क आकारले जाणार आहे. पूर्वी अल्प उत्पन्न गटातील सदनिकाधारकांकडून प्रति महिना २१२१ रुपये आणि प्रति महिना मध्यम उत्पन्न गटातील सदनिका धारकांकडून ३,४९३ रुपये प्रतिमाह सेवाशुल्क आकारण्यात येत होते. या वसाहतीतील सदनिकाधारकांना सूट दिलेल्या सेवाशुल्कावर अतिरिक्त ५० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला. थकीत सेवाशुल्कावरील आकारण्यात येणारे विलंब शुल्क माफ करण्यात येत असून, मूळ सेवाशुल्क भरण्याकरिता मार्च २०२५ पर्यंत मुभा देण्यात आली आहे.
फरकाची रक्कम सेवा शुल्कामध्ये समायोजित
एप्रिल २०२५ पासून वार्षिक १८ टक्के दराने आकारण्यात येणारे विलंब शुल्क आता वार्षिक १२ टक्के दराने आकारण्यात येणार आहे. ज्या सदनिकाधारकांनी सेवा शुल्काचा भरणा केलेला आहे, त्या सदनिकाधारकांच्या सेवाशुल्कातील फरकाची रक्कम पुढील सेवा सेवाशुल्कामध्ये समायोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती कोंकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.