Join us

वर्षानुवर्षे वंचित राहिलेल्या ९५ कुटुंबीयांना मिळणार हक्काच्या घराचा ताबा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 3:42 AM

अनेक वर्षांपासून घरापासून वंचित राहिलेल्या ९५ कुटुंबीयांना आता लवकरच हक्काच्या घराचा ताबा मिळणार आहे.

मुंबई : अनेक वर्षांपासून घरापासून वंचित राहिलेल्या ९५ कुटुंबीयांना आता लवकरच हक्काच्या घराचा ताबा मिळणार आहे. मास्टरलिस्टमध्ये त्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. आॅनलाइन मास्टरलिस्टसाठी आतापर्यंत ९६९ रहिवाशांनी नोंदणी केली होती.गेल्या चाळीस वर्षांपासून मुंबईमध्ये हजारो कुटुंबे आपल्या हक्काच्या घरापासून वंचित राहिली होती. या कुटुंबीयांची हक्काची घरे निष्कासित करून त्यांना बेघर करण्यात आले होते, शिवाय त्यांना धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या म्हाडाच्या संक्रमण शिबिरात जीव धोक्यात घालून राहण्याची वेळ आली होती.यातील पात्र रहिवाशांची यादी म्हणजे मास्टरलिस्ट. या मास्टरलिस्टच्या माध्यमातून या रहिवाशांना कायमस्वरूपी घर देण्याची जबाबदारी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना (आरआर) मंडळाच्या अधिकाऱ्यांवर आहे. म्हाडाने मास्टरलिस्टवरील घरे देण्यासाठी आॅनलाइन अर्ज रहिवाशांकडून मागवले होते. एकूण ९६९ अर्ज म्हाडाकडे आले. यामध्ये जुन्या पात्र अर्जदारांसह ११ अर्जदार पात्र ठरले. त्यानुसार म्हाडाने त्या यादीवर ९५ प्रकरणांचा निपटारा म्हाडाच्या अधिकाऱ्यांना केला. यानुसार आज ९५ रहिवाशांची मास्टरलिस्ट जाहीर करण्यात आली. मार्च २०१९ मध्ये म्हाडा प्राधिकरण बैठकीत त्या प्रकारचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.याप्रमाणे या मास्टरलिस्टमध्ये नावांचा समावेश होण्यासाठी दाखल झालेल्या अर्जांची संख्या ९६९ इतकी आहे. त्यातील ९५ कुटुंबांच्या अर्जांची छाननी, पात्रता निश्चिती झाल्यानंतर त्यांना घरांचा ताबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच जे अर्जदार या प्रकियेत अपात्र ठरले आहेत, त्यांचा घरांचा हक्क म्हाडा हिरावून घेणार नसल्याची माहिती इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी दिली. तसेच लवकरच कमिटीची बैठक घेऊन पुढील आॅनलाइन अर्ज भरण्यास कधी सुरू करायची हे ठरवण्यात येईल, असेही ते या वेळी म्हणाले.

टॅग्स :घरमुंबई