अहमदनगर/मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. त्यात, राष्ट्रवादीच्या एकूण आमदारांपैकी बहुतांश आमदार अजित पवारांच्या गटात सगभागी झाले आहेत. विशेष म्हणजे या आमदारांपैकी ९ जणांनी मंत्रिपदाची शपथही घेतली आहे. मात्र, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार हे शरद पवारांच्या गटात आहेत. रोहित पवार सातत्याने विचारसरणीचा मुद्दा उपस्थित करत बंडखोर आमदारांवर निशाणा साधत आहेत. आता, त्यांनी बंडखोर आमदारांपैकी ९० ते ९५ टक्के आमदार परत येतील, असा दावा केलाय.
अजित पवार यांच्या गटात गेलेल्या आमदारांची संख्या किती याची चर्चा सातत्याने होते. मात्र, पुढील १०-१५ दिवसांत पाहा काय होतंय, असे म्हणत रोहित पवार यांनी अनेक आमदार परत फिरणार असल्याचे सुतोवाच केले आहेत. तसेच, मला एक कळत नाही की ३६ चा आकडा आपल्याला कशाला पाहिजे. कारण, दोन तृतिअंश बहुमत हे पक्षावर क्लेम करण्यासाठी लागत नाही. तर, गटाला मेजॉरिटी म्हणजे २/3 बहुमतासाठी ३६ आमदारांची गरज असल्याचं सांगितलं जातं. मात्र, दोन तृतीअंश आमदारांची गरज ही या आमदारांचे दुसऱ्या पक्षात विलनीकरण होण्यासाठी लागत असते. मग, त्या आमदारांची भूमिका अशी आहे का, हा गट घ्यायचा आणि भाजपात विलीन व्हायचं?. अशी भूमिका असेल तर ती आपल्याला नंतर कळेल. मात्र, अशी भूमिका आमदारांना कळाली तर माझा अंदाज आहे, ९० ते ९५ टक्के आमदार परत आल्याचे दिसून येईल, असे गणित आमदार रोहित पवार यांनी मांडले.
दरम्यान, यावेळी आमदार रोहित पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीच्या ४० नगरसेवकांचा दाखला देत, भाजपा अपक्ष उमेदवार देऊन घात करतं, खालच्या पातळीचं राजकारण करते, असेही म्हटले.
आमदार रोहित पवार सध्या शरद पवार यांच्या गटाची खिंड लढवत आहेत. आपण शरद पवारांच्या विचारांवर चालत असून भाजपाकडून होत असलेलं राजकारण कोणालाच मान्य नाही, असे म्हणत भाजपवर टीकाही करत आहेत. त्यातच, बंडखोरी केलेल्या वरिष्ठ नेत्यांवरही रोहित पवार यांनी जबरी टीका केली होती. त्यापैकी, छगन भुजबळ यांनी रोहित पवार यांच्यावर पलटवार केला. तसेच, तुमच्या जन्माच्या अगोदर मी आमदार होतो, याची आठवणही करुन दिली.