दीड तासामध्ये ९७ प्रस्ताव मंजूर

By admin | Published: December 29, 2016 02:24 AM2016-12-29T02:24:29+5:302016-12-29T02:24:29+5:30

निवडणुकीपूर्वी हजारो कोटी रुपयांचे प्रस्ताव घाईघाईने आणण्यास प्रशासनाला जबाबदार ठरवणाऱ्या शिवसेनेने, स्थायी समितीच्या बैठकीत मात्र, बुधवारी सपशेल माघार घेतली.

95 proposals approved in one and a half hour | दीड तासामध्ये ९७ प्रस्ताव मंजूर

दीड तासामध्ये ९७ प्रस्ताव मंजूर

Next

मुंबई : निवडणुकीपूर्वी हजारो कोटी रुपयांचे प्रस्ताव घाईघाईने आणण्यास प्रशासनाला जबाबदार ठरवणाऱ्या शिवसेनेने, स्थायी समितीच्या बैठकीत मात्र, बुधवारी सपशेल माघार घेतली. कार्यक्रमपत्रिकेवर ६३ प्रस्ताव पूर्वनियोजित असताना, त्यात आणखी ३४ नवीन प्रस्तावांची भर पडली. मात्र, ऐन वेळी हे प्रस्ताव कुठून आले, याचा जाब विचारणार असल्याचे ठणकावून सांगणाऱ्या शिवसेनेने स्थायी समितीच्या बैठकीत ‘ब्र’ काढला नाही.
मुंबई महापालिकेची निवडणूक २०१७ मध्ये होणार आहे. या निवडणुकीची आचारसंहिता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात एक हजार १०० कोटींचे ७४ प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आले. त्यानंतर, आता लगेचच या आठवड्यात आणखी हजार कोटींचे ४० प्रस्ताव स्थायी समितीपुढे प्रशासनाने आणले. यामध्ये एक कोटीपासून ३९५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या प्रकल्पांचा समावेश आहे.
आयत्या वेळीच्या प्रस्तावावर शिवसेना मौन
बैठकीपूर्वी तीन दिवस आधी स्थायी समिती सदस्यांना प्रस्ताव पाठवण्याचा नियम आहे. मात्र, २७ नवीन प्रस्ताव बुधवारी सकाळी सदस्यांना पाठवण्यात आले, तरी सदस्यांनी हे प्रस्ताव रोखले नाहीत. त्यामुळे पालिका वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)

२७०० कोटींचे प्रस्ताव
महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर विकास कामांचे बार उडवण्यासाठी शिवसेना-भाजपाची धावपळ सुरू आहे. यामुळे गेल्या बुधवारी १२०० कोटींचे झटपट ७४ प्रस्ताव मंजूर करण्यात आले, तर बुधवारी स्थायी समितीमध्ये तब्बल १५०० कोटींचे ९७ प्रस्ताव मंजूर करण्यात आले.

पवईतील हाउसबोट बंद होणार; महापालिका आयुक्तांचा निर्णय
पवई तलावातील दुर्घटनेची गंभीर दखल महापालिकेने घेतली आहे. त्यामुळे विधी खात्याच्या सल्ल्यानंतर या हाउसबोट बंद करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यानुसार लवकरच या हाउसबोटच्या मालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे.
पवई तलावात बोटिंगसाठी गेलेल्या आठ जणांच्या बोटीला अपघात झाला. ही बोट लोखंडी रॉडला आदळून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले. या तलावात बेकायदेशीररीत्या हाउसबोट चालवली जात असल्याचा आरोप झाला. तसेच या प्रकरणाची चौकशी करून हाउसबोट बंद करण्याची मागणीही होऊ लागली आहे.
त्यानुसार आयुक्तांनीही कठोर पावले उचलत हाउसबोट बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पवई तलावात झालेल्या दुर्घटनेनंतर कडक कारवाईचा इशाराच आयुक्तांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला. त्यानुसार लवकरच हाउसबोट मालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी या नोटीस संबंधितांना बजावल्या जाणार आहेत.

पवई तलावात गेल्या शुक्रवारी रात्री नौकाविहारसाठी गेलेल्या सातपैकी तीन जणांचा त्यांची हाउसबोट मासे पकडण्याचे जाळे व रॉडला आपटल्यामुळे मृत्यू झाला.
तलावात बेकायदेशीरपणे हाउसबोट चालवली जाते, असा आरोप स्थानिक राजकीय नेत्यांनी केला आहे. सणासुदीच्या काळात हाउसबोटचा व्यवसाय तेजीत असतो. त्यामुळे भविष्यात अशा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
३१ डिसेंबरला नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नौकाविहारसाठी पवई तलावात गर्दी होईल, ही शक्यता लक्षात घेऊन आणखी अपघात टाळण्यासाठी हाउसबोट बंद करण्यात येणार आहे.

Web Title: 95 proposals approved in one and a half hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.