मुंबई, ठाण्यातील शाळांचा निर्णय अद्याप नाहीच
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातल्या ९वी ते १२वी चे वर्ग असलेल्या ९५ टक्के शाळा सुरू झाल्या असून, मुंबई व ठाणे जिल्ह्यांतील शाळांचा निर्णय अद्याप झालेला नाही. राज्यातील शाळा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांची उपस्थिती मात्र अजूनही नगण्य आहे. ९५ टक्के सुरू वर्गांमध्ये सद्य:स्थितीत केवळ ३८ टक्के विद्यार्थ्यांनीच आपली उपस्थिती दर्शविली आहे. शालेय शिक्षण विभागाकडून २७ जानेवारीपासून ५वी ते ८वी चे वर्ग सुरू करण्याची तयारी होत असली, तरी तिथे किती विद्यार्थी उपस्थिती लावतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
१८ जानेवारी २०२१ च्या माहितीनुसार राज्यात नववी ते बारावीच्या २१ हजार २८७ शाळा सुरू झाल्या असून, २१ लाख ६६ हजार ५६ विद्यार्थी या वर्गांमध्ये आपली उपस्थिती दर्शवित आहेत. राज्यातील ९ वी ते १२ वी च्या एकूण विद्यार्थी संख्येपेक्षा ही संख्या अत्यल्प असली तरी पुढील काही दिवसांत ८ वी पर्यंतचे वर्ग सुरू झाल्यावर त्यात वाढ होण्याची अपेक्षा अधिकारी, शिक्षक, संस्थाचालक व्यक्त करत आहेत. वर्धा, वाशीम, बीड , जळगाव या जिल्ह्यांत पूर्ण क्षमतेने म्हणजेच १०० टक्के शाळा सुरू झाल्या आहेत, तर उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, जालना, रायगड, सिंधुदुर्ग, वाशीम, जळगाव, परभणी यासारख्या जिल्ह्यांत विद्यार्थ्यांची उपस्थिती ५० टक्क्यांहून अधिक असल्याचे दिसून आले आहे.
शैक्षणिक वर्षाच्या मूल्यमापनावर प्रश्नचिन्ह कायम....
राज्यात ९वी ते १२वी च्या शाळा सुरू होऊन काही जिल्ह्यांत विद्यार्थी उपस्थिती ही बेताची आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थी अद्यापही ऑनलाईन शिक्षणाचाच मार्ग निवडताना दिसत आहेत. त्यातच शैक्षणिक वर्ष संपायला अवघे काही महिने उरले असताना शिक्षण विभागाकडून यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे मूल्यमापन कसे करणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहेत.