९५ एसपी, अप्पर अधीक्षकांच्या बदल्यांचा गुंता कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:06 AM2021-08-26T04:06:03+5:302021-08-26T04:06:03+5:30
जमीर काझी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जिल्हा पोलीस अधीक्षक, उपायुक्त, अप्पर अधीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्याचे घोंगडें ...
जमीर काझी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जिल्हा पोलीस अधीक्षक, उपायुक्त, अप्पर अधीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्याचे घोंगडें भिजत राहिले आहे. बदल्यांच्या मुदतीला अवघे ५ दिवस उरले असताना गृह विभागाकडून त्याबाबत अद्याप बैठक झालेली नाही. त्यामुळे राज्यातील ९५ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुमारे १४० अधिकाऱ्यांची अस्वस्थता वाढली आहे.
बदल्यांबाबत राज्य सरकार व पोलीस महासंचालक यांच्यात अद्याप एकवाक्यता झालेली नाही. हा गुंता दोन दिवसांत मार्गी लागल्यास बदल्या होतील, असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. सोमवारी ३८ अतिवरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने जारी केले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आयपीएस केडरचे ३४ अधीक्षक, उपायुक्त बदलीसाठी पात्र आहेत. एक जण नियुक्तीच्या प्रतीक्षेत तर ४ जणांनी बदलीसाठी विनंती केली आहे. त्याचप्रमाणे ५६ असंवर्ग (नॉन केडरचे) अप्पर अधीक्षक, उपायुक्तांचा सध्याच्या ठिकाणचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. या ९५ जणांपैकी काहींना आहे त्या ठिकाणी मुदतवाढ हवी आहे, पण पांडे त्यासाठी राजी नाहीत.
नेते दुहेरी पेचात
बदल्यांच्या कथित रॅकेटचा विषय उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे नेत्यांना यंदा फारसा आग्रह करता येत नाही, तर दुसरीकडे येत्या दोन वर्षांत मुंबईसह १०-१२ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने त्यांना मर्जीतील अधिकारी हवे आहेत. मात्र त्यासाठी आग्रह धरणे धोक्याचे असल्याने पांडे यांच्याकडे पूर्णवेळ कार्यभार न देता अतिरिक्त ठेवण्याचे धोरण आहे.