CoronaVirus Updates: आयसीयूतील ९६ टक्के रुग्ण डोस न घेतलेले; मुंबईतील चित्र; १९०० रुग्ण ऑक्सिजनवर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 08:35 AM2022-01-09T08:35:00+5:302022-01-09T08:35:15+5:30
लस घेतलेल्यांमध्ये कोरोना किंवा डेल्टा, ओमायक्रॉन संसर्ग हा अतिदक्षता विभागापर्यंत जात नसल्याचेही पालिकेने नमूद केले. म्हणजेच लसीकरण झालेले असल्यास सौम्य संसर्ग किंवा लक्षणविरहित रुग्ण दिसून येत असल्याचे पालिकेने सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या ९६ टक्के रुग्णांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस न घेतल्याची माहिती मुंबई महापालिका प्रशासनाने दिली आहे. शहर उपनगरांत १८६ रुग्णालयांत दाखल असलेले १९०० रुग्ण ऑक्सिजन खाटांवर उपचार घेत असून, त्यांचे लसीकरण झालेले नसल्याची बाब समोर आली आहे.
लस घेतलेल्यांमध्ये कोरोना किंवा डेल्टा, ओमायक्रॉन संसर्ग हा अतिदक्षता विभागापर्यंत जात नसल्याचेही पालिकेने नमूद केले. म्हणजेच लसीकरण झालेले असल्यास सौम्य संसर्ग किंवा लक्षणविरहित रुग्ण दिसून येत असल्याचे पालिकेने सांगितले. रुग्णालयात दाखल करण्याचे रुग्णांचे प्रमाण वाढल्यास आणि ऑक्सिजनची गरज अधिक भासल्यास त्वरित लॉकडाऊन करण्यात य़ेईल, असा इशारा मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिला आहे.
शहर उपनगरातील सक्रिय रुग्णांनी ९० हजारांचा टप्पा ओलांडला असला, तरीही केवळ १० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज सध्या भासत
आहे, अशी माहिती पालिकेने दिली आहे.
असे वाढले सक्रिय रुग्ण
n३० नोव्हेंबरला २,०५२ सक्रिय रुग्ण होते, त्यात १,१२८ लक्षणे नसलेले, ७५१ लक्षणे असलेले तर १७३ क्रिटिकल रुग्ण होते.
n२ जानेवारीला २९ हजार ८१९ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे.
n५ जानेवारीला ६१ हजार ९२३ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात ५३ हजार ८७५ लक्षणे नसलेले, ७,७३१ लक्षणे असलेले तर ३१७ क्रिटिकल रुग्ण आहेत.
n६ जानेवारी रोजी सक्रिय रुग्णांची संख्या ७९ हजार २६० वर गेली आहे. यामुळे गेल्या महिनाभरात ७७ हजार २०८ सक्रिय रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
महिनाभरात ९० हजार ९२८ रुग्णांची नोंद
मुंबईत कोरोनाच्या दोन लाटा आल्या आहेत. या दोन्ही लाटा थोपवल्यावर डिसेंबरपासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कोरोना आटोक्यात असताना ३० नोव्हेंबरपर्यंत मुंबईत एकूण ७ लाख ६२ हजार ८८१ रुग्णांची नोंद झाली. महिनाभरानंतर ६ जानेवारीला एकूण ८ लाख ५३ हजार ८०९ रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या महिनाभरात मुंबईत कोरोनाच्या ९० हजार ९२८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.