गृह विभागाचे आदेश जारी : एमएमआरडीएतील ५० हून अधिक अधिकारी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या सव्वा वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. राज्य सरकारने ९६ अधिकाऱ्यांना नाताळची भेट देत त्यांची साहाय्यक आयुक्त, उपअधीक्षकपदी बढती केली. गृह विभागाने गुरुवारी यासंदर्भातील आदेश जारी केले.
बढती मिळालेल्यांमध्ये ५० हून अधिक अधिकारी मुंबई, पोलीस दल एमएमआरडीए परिक्षेत्रातील आहेत. त्यापैकी बहुतांश जणांना याच परिसरात नियुक्ती देण्यात आली आहे.
२९५ पदे रिक्त असतानाही रखडलेल्या बदल्यांचा विषय ‘लोकमत’ने सातत्याने लावून धरला हाेता. त्यानंतर आता प्रशासनाने यासंदर्भातील कार्यवाही सुरू केली आहे. बढतीसाठी पात्र ठरलेल्या १०२ अधिकाऱ्यांपैकी काही निवृत्त झाले तर काहींची विभागीय चौकशी रखडल्याने त्यांना पदोन्नती देण्यात आलेली नाही. अन्य अधिकाऱ्यांना नवनियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी तातडीने कार्यमुक्त करण्याबाबत घटक प्रमुखांना सूचना कराव्यात, असे गृह विभागाने स्पष्ट केले.
...............................