मुंबई :
गेल्या काही महिन्यांपासून विमान प्रवासात झालेल्या विक्रमी वाढीनंतर आता उन्हाळी सुट्यांमध्ये प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबई विमानतळावरून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा विमान फेऱ्यांमध्ये १४ टक्क्यांनी वाढ होणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.मुंबई विमानतळावरून २८ ऑक्टोबरपर्यंत विमान फेऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार असून याकरिता विमानांच्या वेळापत्रकाचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबई विमानतळावरून देशातील विविध ठिकाणी दिवसाकाठी ७१४ विमाने उड्डाण घेतील, तर २५२ आंतरराष्ट्रीय विमान सेवा कार्यान्वित होतील. एकूण ९६६ विमाने दिवसाकाठी विमानतळावरून उड्डाण भरणार आहेत. हा ऑक्टोबर २०२२ नंतरचा उच्चांक आहे.
वाढीव विमान प्रवासामध्ये इंडिगो विमान कंपनी अग्रेसर असेल. कारण आठवड्याकाठी कंपनी एकूण ४७ टक्के अधिक फेऱ्या करणार आहेत. तर एअर इंडियाची वाहतूक १७ टक्क्यांनी वाढेल. विस्तारा विमान कंपनीची वाहतूक १४ टक्क्यांनी वाढणार आहे.