मोफत पाठ्यपुस्तकांचे ९७ टक्के वाटप पूर्ण, नववी ते बारावीबाबत संदिग्धता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 06:08 AM2018-06-17T06:08:41+5:302018-06-17T06:08:41+5:30
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती नवीन पाठ्यपुस्तके पडली आहेत.
- सीमा महांगडे
मुंबई : नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती नवीन पाठ्यपुस्तके पडली आहेत. समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या मुंबईतील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना विषयनिहाय पुस्तकांचे जवळपास ९७ टक्के वाटप पूर्ण झाल्याची माहिती मिळाली आहे.
कोणताही विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित राहू नये, मुलांची शंभर टक्के उपस्थिती टिकविणे व गळतीचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके योजना सुरू केली असून मुंबईत त्याला उत्तम यश मिळाले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
मोफत पाठ्यपुस्तक वाटपाचा विषय नेहमीच चर्चेचा मुद्दा ठरतो. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानातून मोफत पुस्तके दिली जातात. यंदा ही योजना समग्र शिक्षा अभियानांतर्गत राबविली जात आहे. त्यानुसार मुंबई विभागातून तालुकानिहाय एकूण २०,१६,८२३ पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी १९,६४,३२६ पुस्तके उपसंचालक कार्यालयाला प्राप्त झाली असून १८,७२,२०२ पुस्तकांचे शाळास्तरावर वाटप झाल्याची माहिती मिळाली आहे. आता केवळ ९२,१२४ पुस्तके शिल्लक असून त्यांचेही वाटप लवकरच होईल, असे सांगण्यात येत आहे. एकूणच मुंबई विभागात ९७.४० टक्के मोफत पुस्तकांचे वाटप झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
बालभारतीचे संचालक सुनील मगर यांनी सांगितले की, मुंबईसह राज्यात बालभारतीकडून मोफत पाठ्यपुस्तके पोहोचली आहेत. विद्यार्थी हितासाठी हे काम १५ जूनआधीच १०० टक्के पूर्ण केले आहे.
>समग्र शिक्षा अभियान
या वर्षापासून सर्वशिक्षाऐवजी समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येत आहे. समग्र शिक्षा अभियानात ६० टक्के सहभाग केंद्र सरकार व ४० टक्के सहभाग राज्य सरकारचा असेल. केंद्र सरकारच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत यासाठी पहिली ते १२ वी पर्यंतच्या इयत्तांचा समावेश असणार आहे. मात्र अद्याप ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांनाही मोफत पाठ्यपुस्तके मिळणार की नाही याबाबत संदिग्धता आहे.