पहिला डोस घेतलेल्या लाभार्थ्यांमध्ये ९७.५ टक्के अँटिबॉडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:06 AM2021-07-22T04:06:10+5:302021-07-22T04:06:10+5:30
पालिकेचे सर्वेक्षण : केवळ १५ टक्के मुंबईकरांनी घेतले लसींचे दोन्ही डोस लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, ...
पालिकेचे सर्वेक्षण : केवळ १५ टक्के मुंबईकरांनी घेतले लसींचे दोन्ही डोस
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, पहिला डोस जवळपास ५५ टक्के नागरिकांनी घेतला असून १५ टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. त्यांना आता कोविडपासून ९९ टक्क्यांपर्यंत सुरक्षा मिळाली आहे. शिवाय, पहिला डोस घेतलेल्यांमध्येही प्रतिपिंड (अँटिबॉडी) तयार होऊन ९७.५ टक्क्यांपर्यंत कोविडपासून सुरक्षा मिळू शकते, असे मुंबई पालिकेच्या सर्वेक्षणात आढळले आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, मुंबईत आतापर्यंत एकूण ६५ लाख २४ हजार ८४१ डोस मिळाले आहेत. त्यापैकी १४ लाख ९६ हजार ४९६ मुंबईकरांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर ५० लाख २८ हजार ३४३ मुंबईकरांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. १५ लाखांपैकी १८ वर्षांवरील ७० हजार ५५ नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तर, ४५ वर्षांवरील ११ लाख ३६ हजार ९४३ नागरिकांना आणि ६० वर्षांवरील ५ लाख ५८ हजार ७४० नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत.
पहिला डोस घेतल्यावर शरीरात अँटिबॉडीज तयार व्हायला सुरुवात होते. त्यानेही कोरोनापासून बचाव होण्यास बरीचशी मदत होते. दुसऱ्या लाटेत केलेल्या सर्व्हेत लस घेतलेल्यांपैकी २.६६ टक्के लोकांना कोविड झाला होता. दोन्ही डोस घेतलेल्या लोकांपैकी ०.१ लोकांनाच कोविड झाला होता. पहिला डोस घेतल्यावरही कोरोनाची लागण होत नाही असे स्पष्ट झाले होते. पालिकेने नुकतेच ४ लाख बाधितांचे सर्वेक्षण केले. त्या ४ लाखांपैकी फक्त २.६६ टक्के म्हणजेच १०६०० लोकांनी हा पहिला डोस घेतला होता आणि त्यातील २६ जणांना लागण झाली होती, हे प्रमाण ०.०१ टक्के आहे. दोन्ही डोस घेतलेल्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी आहे. पण तरीही हात धुणे, मास्क लावणे आणि अंतर ठेवणे याचे पालन करणे बंधनकारक आहे, अशी माहिती मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.