माहीम येथील घटना, गुन्हा दाखल
गिफ्ट मिळवण्याच्या नादात गमावले ९८ हजार
माहीम येथील घटना : गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ॲमेझाॅनच्या लकी ड्रॉअंतर्गत गिफ्ट लागल्याचे सांगून बँक अधिकाऱ्याच्या मुलीची ९८ हजार ५७२ रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी माहीम पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवीत तपास सुरू केला आहे.
माटुंगा परिसरात २७ वर्षीय तक्रारदार तरुणी कुटुंबीयांसोबत राहते. तिचे वडील नामांकित बँकेत मुख्य व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. १ जुलै रोजी तरुणीला अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या महिलेने ॲमेझाॅनमधून बोलत असल्याचे सांगून, लकी ड्राॅमध्ये गिफ्ट लागल्याचे सांगत, पाचपैकी एक गिफ्ट सिलेक्ट करायला सांगितले. तरुणीने फ्रीज सिलेक्ट केला. पुढे गिफ्ट मिळविण्यासाठी ॲमेझाॅनचे पाच हजार रुपयांचे व्हाऊचर खरेदी करण्यास सांगितले. तरुणीने पैसेही पाठविले. पुढे वेगवेगळी कारणे देत तरुणीच्या खात्यातून एकूण ९८ हजार ५७२ रुपये उकळण्यात आले. मात्र आणखी पैशाची मागणी होताच, तरुणीला संशय आला. तिने घडलेला प्रकार वडिलांना सांगितला. त्यांनी याप्रकरणी माहीम पोलिसांकडे तक्रार केली.