मुलुंडमध्ये दुमदुमली नाट्यदिंडी, सेलिब्रेटीही झाले सामील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 01:23 AM2018-06-14T01:23:40+5:302018-06-14T01:23:40+5:30
४०० लोककलावंत, ढोलताशा वाजवणारे सेलिब्रेटी, आणि सहा फुटी कोंबड्याने नाट्यसंमेलनापूर्वीच्या दिंडीची रंगत वाढली. सेलिब्रेटींना पाहायला मुलुंडवासीयांनी रस्त्याच्या दुतर्फा तोबा गर्दी केली होती.
मुंबई - ४०० लोककलावंत, ढोलताशा वाजवणारे सेलिब्रेटी, आणि सहा फुटी कोंबड्याने नाट्यसंमेलनापूर्वीच्या दिंडीची रंगत वाढली. सेलिब्रेटींना पाहायला मुलुंडवासीयांनी रस्त्याच्या दुतर्फा तोबा गर्दी केली होती.
रेल्वे स्थानकाजवळील हनुमानाचे दर्शन घेऊन दिंडी मार्गस्थ झाली. त्यातील नाट्यकलावंत आणि लोेककलावंताच्या उपस्थितीने पुढचा तासभर ही दिंडी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष विनोद तावडे हे पालखीचे भोई झाले होते. नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार याही नाट्यदिंडीत सहभागी झाल्या होत्या. अभिनेते शरद पोंक्षे, भरत जाधव, प्रदीप वेलणकर, मंगेश देसाई, मधुरा वेलणकर, सागर कारंडे, भारत गणेशपुरे अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, सुयश टिळक, सौरभ गोखले या सेलिब्रेटींनी दिंडीत सहभागी होऊन लोककलाकारांना प्रोत्साहन दिले. स्थानिक रंगकमीर्ही त्यात होते. साधारण दीड तासानंतर दिंडी नाट्यनगरीत दाखल झाली. सेलिब्रेटींसोबत सेल्फी काढण्यासाठी नाट्यदिंडीत नागरिकांची झुंबड उडाली होती. सेलिब्रेटी सामील असलेल्या मोरया ढोलताशा पथकाला पाहण्यासाठी गर्दी झाली होती. सुयश टिळक, सौरभ गोखले, अमोल बावडेकर यांनी या पथकात वादनाचा मनमुराद आनंद लुटला. अभिनेत्री स्मिता तांबेने घातलेली फुगडी गाजली.
सेलिब्रेटींसोबतच आदिवासी नृत्य, शेतकरी नृत्य, आदिवासी बोहाडा, तारपा, धनगरी गोफ, धनगरी गजो, कातरखेळ, भाल्या, दशावतार, लेझीम, दांडपट्टा अश्या १६ लोककलांचा सहभाग यात होता. रंगीबेरंगी पोशाखातील या लोककलावंताना पाहण्यासाठी जशी दिंडीमार्गावर गर्दी होती, तशीच त्यांचे फोटो टिपण्यासाठीही झुंबड उडत होती. ते लगेच सोशल मीडियावर अपलोड केले जात होते. नाट्यसंमेलनाच्या इतिहासात इतक्या लोककलावंतासह पार पडलेली ही एकमेव नाट्यदिंडी ठरली. दरम्यान, लोककलेतून महाराष्ट्रातील प्रत्येकाला ताल धरायला लावणाऱ्या अशोक हांडे यांच्या ‘मराठी बाणा’ या संगीतमय कार्यक्रमाने ९८व्या नाट्यसंमेलनाचा श्रीगणेशा झाला.
सहा फुटी कोंबडा गेला भाव खाऊन
नाट्यदिंडीत तारे-तारकांची उपस्थिती असूनही सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते सहा फुटी कोंबड्याने. नाट्यदिंडीत सर्वात शेवटी असलेल्या या कोंबड्याच्या उड्यांना सर्वांचीच दाद मिळली. दिंडीची सांगता होईपर्यंत या कोंबड्याचाच बोलबाला होता. हनुमान मंदिरापासून ते नाट्यनगरीपर्यंतच्या नाट्यदिंडीच्या वाटेत अनेक नागरिकांनीच नव्हे, तर सेलिब्रेटींनीही या कोंबड्यासोबत सेल्फी घेतली.
आज नाट्यसंमेलनात
गुरुवार, १४ जून
सकाळी १० वाजता
बालनाट्य - तेलेजू
सादरकर्ते- रंगसंवाद प्रतिष्ठान, सोलापूर
स्थळ- महाकवी कालिदास रंगमंच
सकाळी ११ वाजता
ग्रिप्स थिएटर जंबा बंबा बू
सादरकर्ते- महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे
स्थळ- महाकवी कालिदास रंगमंच
दुपारी २ वाजता
एकांकिका- इतिहास गवाह है
सादरकर्ते- बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय, पुणे
स्थळ- महाकवी कालिदास रंगमंच
दुपारी ३ वाजता
नृत्य-नाटिका, तुका म्हणे
सादरकर्ते- कलावर्धिनी, पुणे
स्थळ- महाकवी कालिदास रंगमंच
दुपारी ४ वाजता
परिसंवाद- सांस्कृतिक आबादुबी
स्थळ- डॉ. हेमू अधिकारी रंगमंच
सायंकाळी ६ वाजता
गो.ब. देवल पुरस्कार वितरण सोहळा
नाट्यसंमेलनध्यक्षा कीर्ती शिलेदार यांची मुलाखत, नाट्यप्रवेश व नाट्यगीत
स्थळ- महाकवी कालिदास रंगमंच
रात्रौ ९ वाजता
संगीतबारी, सादरकर्ते- काळी बिल्ली प्रॉडक्शन,
स्थळ- महाकवी कालिदास रंगमंच
मध्यरात्री १२.३० वाजता
लोककला जागर
झाडीपट्टी दंडार, पोतराज, दशावतार, नमन यांचे सादरीकरण
स्थळ- महाकवी कालिदास रंगमंच
पहाटे ६ वाजता
प्रात:स्वर
सादरकर्त्या- मंजुषा पाटील, सावनी शेेंडे
स्थळ- महाकवी कालिदास रंगमंच