98th Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan : राजकीय पक्षांचे जोरदार शक्तिप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 01:04 AM2018-06-14T01:04:27+5:302018-06-14T01:04:27+5:30
- नम्रता फडणीस
मुंबई : नाट्यसंमेलनातून पुढील वर्षाच्या निवडणुकीच्या प्राचाराचा अजेंडा तर राबवला जात नाही ना, अशी शंका व्यक्त करत ज्येष्ठ कलावंतांनी टीकेचा सूर लावलेला असतानाच ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन स्थळाच्या जवळील रस्त्यांवर उभारलेल्या कमानींवर स्थानिक नेत्यांच्या प्रतिमा आणि संकुलाबाहेर विविध नेत्यांच्या फ्लेक्सबाजीमधून जोरदार शक्तिप्रदर्शन पाहायला मिळते आहे. त्यातून हे संमेलन ही जणू निवडणुकीची पूर्वतयारी असल्याचे वातावरण निर्माण झाले.
यंदाच्या संमेलनाच्या पत्रिकेत माजी पदाधिकाऱ्यांना डावलून राजकीय नेत्यांची जंत्रीच अधिक असण्यावर माजी पदाधिकारी लता नार्वेकर यांनी आक्षेप घेत हे संमेलन म्हणजे निवडणुकीची पूर्वतयारी आहे, अशा शब्दात मध्यवर्ती शाखेवर टीकास्त्र सोडले होते आणि संमेलनावर बहिष्कार टाकण्याचे जाहीर केले होते; पण संमेलनात येणारे नेते आणि रसिकांच्या शुभेच्छांचे फलक लावून स्वागत करण्याची अहमहमिका पाहता त्यांच्या आरोपांना एकप्रकारे पुष्टीच मिळाल्याची चर्चा रसिकांत सुरू होती.
कोणत्याही कार्यक्रमाला किंवा संमेलनाला राजकीय नेत्यांना बोलावण्याची परंपरा नवीन नाही; पण उद््घाटन सोहळ्याचे मुख्य निमंत्रित असलेले मुख्यमंत्री परदेश दौºयावर असल्याने सांस्कृतिक कार्यमंत्री आणि स्वागताध्यक्ष असलेले विनोद तावडे यांच्या रूपाने भाजपाचा संमेलनावर वरचष्मा आहे. विश्वस्त असल्याने शरद पवार उद््घाटन सोहळ्यात होतेच; पण गुरुवारी वाढदिवसानिमित्त संमेलनाला येणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना एक दिवस अलीकडे उद््घाटनाच्या सोहळ्याला बोलावल्याने तेथे राष्ट्रवादी, मनसेच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती वाढली. समारोपाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांना बोलावून कोणतेच प्रमुख पक्ष नाराज होणार नाहीत, याची काळजी तावडे यांनी नाट्य परिषदेच्या पदाधिकाºयांच्या माध्यमातून घेतली.