टीईटी उत्तीर्ण ९९ हजार उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 05:45 AM2020-08-08T05:45:11+5:302020-08-08T05:45:33+5:30
नव्या शैक्षणिक धोरणातही सर्व शाळांमध्ये टीईटी पात्र शिक्षकांनाच नियुक्तीची सक्ती केली आहे.
सांगली : राज्य शिक्षण परिषदेने घेतलेल्या टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) परीक्षेत यंदा ३ लाख ४३ हजार २४२ उमेदवारांतून अवघे १६ हजार ५८२ उमेदवार उत्तीर्ण झाले. निकाल फक्त ४.८३ टक्के आहे. २०१३ पासून सहावेळा झालेल्या परीक्षांत ८६ हजार २९८ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. या सर्वांना नोकऱ्या मात्र मिळालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता आहे.
नव्या शैक्षणिक धोरणातही सर्व शाळांमध्ये टीईटी पात्र शिक्षकांनाच नियुक्तीची सक्ती केली आहे. सध्या राज्यात केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) उमेदवारही २० हजारहून अधिक आहेत, तर टीईटी उत्तीर्ण एक लाखाहून अधिक आहेत. तरीही अनेक खासगी व विनाअनुदानित शाळांमध्ये आर्थिक व्यवहारांद्वारे अपात्र शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत. यामुळे शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन होत आहे.
लॉकडाऊनपूर्वी शासनाने भरती प्रक्रिया सुरु केली, पण ११ हजारपैकी ७ हजार जागा भरल्यानंतर चार हजार जागांची भरती खोळंबल्याने उमेदवारांचा भ्रमनिरास झाला. कोरोनामुळे भरती प्रक्रिया लवकर सुरु होण्याची चिन्हे नाहीत.
पात्र उमेदवार व रिक्त जागा
च्टीईटी उत्तीर्ण - ७९ हजार
च्सीटीईटी उत्तीर्ण - २० हजार
च्रिक्त जागा ३६ हजार
( पहिली ते दहावीसाठी)
च्रिक्त जागा ४ हजार
( अकरावी व बारावासाठी)
च्शिवाय ८ हजार शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसतानाही सेवेत कायम आहेत. त्यांना मुक्त करण्याचे आदेश न्यायालयाने देऊनही शासनाने कार्यवाही केलेली नाही. या जागांवरही पात्रताधारक उमेदवारांना संधी मिळू शकते.
शासनाने सर्व शाळांत टीईटी आणि सीटीईटी पात्र उमेदवारांनाच नियुक्ती द्यायला हवी. बालहक्क आणि शिक्षणहक्क कायद्याचे काटेकोर पालन होईल, याकडे लक्ष द्यावे. पात्र उमदेवारांवर अन्याय सहन केला जाणार नाही.
- प्रा. अर्जुन सुरपल्ली, राज्याध्यक्ष, पवित्र शिक्षक संघर्ष समिती.