लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अंधेरी पूर्वेतील पी.एम.जी.पी इमारत धोकादायक झाली आहे. पहिल्या माळ्यावरील बाल्कनीचा स्लॅब कोसळण्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. येथील रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. टेकू लावलेल्या अती धोकादायक इमारतीत रहिवासी जीव मुठीत घेऊन राहत आहे. येथे ९९४ कुटुंब राहत आहेत. त्यामुळे इमारतीची पाहणी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
शुक्रवारी दर्शन को-ऑपरेटिव्ह सोसायटी ७ नंबर बिल्डिंगमधील रूम नंबर ८ पहिल्या माळ्यावर राहणारे ज्येष्ठ नागरिक मॅरी अथणी यांच्या मागील बाजूचा बाल्कनीचा भाग कोसळला. यावेळी ते थोडक्यात बचावले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी धोकादायक इमारतीतील रहिवासी भीतीच्या छत्रछायेखाली आपले आयुष्य जगत असल्याचे वास्तव पाहायला मिळत आहे.
विधानसभेत लक्षवेधीविधानसभेत अनेक वेळा लक्षवेधी, तारांकित प्रश्न, औचित्याचा मुद्दा या इमारतीच्या पुनर्विकासाबाबत प्रश्न मांडला गेला. अनेक बैठका मुख्यमंत्री आणि म्हाडा सीईओ यांच्यासमवेत घेण्यात आल्या. यासाठी रवींद्र वायकर यांनी पुढाकार घेतला. मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यास सरकार जागे होणार का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
१६ वर्षांपासून पुनर्विकास रखडला आहे. घरातील स्लॅब व छताचा भाग कोसळत असल्यामुळे रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. पीएमजीपी वसाहतीत १७ इमारतीतील ९९४ कुटुंब सध्या भीतीच्या छत्रछायेत वास्तव्य करत आहेत. येथील अनेक इमारतीना टेकू लावण्यात आला आहे. अनेक इमारती धोकादायक स्वरूपात असल्यामुळे कधीही कोसळण्याची शक्यता आहे.