मुंबई- यंदा प्रवाशांचा दिवाळी सुट्टीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी एसटीने 1 नोव्हेंबरपासून विशेष बस फेऱ्या सोडण्याचे नियोजन केले असून, दिवाळीच्या कालावधीत महाराष्ट्रातील विविध बसस्थानकांमधून 9320 फेऱ्या (नियोजित फेऱ्या वगळून) सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांसाठी सदर जादा फेऱ्यांचे आगाऊ आरक्षण सध्या उपलब्ध करून देण्यात आले आहे. “ऐनवेळीचा गर्दीचा त्रास टाळण्यासाठी प्रवासी बंधू-भगिनींनी वेळेत आरक्षण करून आपले आसन निश्चित करावे”, असे आवाहन एसटी महामंडळाचे अध्यक्ष व मा. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे.
एस.टी. महामंडळाने यंदा दिवाळीसाठी प्रदेश निहाय जादा वाहतुकीचे नियोजन केले असून, नियमित फेऱ्यांबरोबरच ज्या मार्गावर प्रवासी गर्दी आहे, अशा मार्गांवर यापूर्वीचा अनुभव विचारात घेऊन जादा बसेसच्या फेऱ्या आरक्षणासाठी प्रवाशांना उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचबरोबर ऐनवेळी बसस्थानकावर होणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन संबंधित आगार व्यवस्थपकांनी त्वरित जादा बसेस प्रवाशी मागणीनुसार उपलब्ध करून देण्याचे आदेश मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने पुढील सूचना मध्यवर्ती कार्यालयाकडून स्थानिक एसटी प्रशासनांना निर्गमित झाल्या आहेत.
दिवाळी सणाच्या कालावधीत बसस्थानके सुशोभित करावीत व मंगलमय वातावरण निर्मिती करावी. मोठ्या प्रमाणात जादा वाहतूक होणार असल्याने मार्गस्थ बिघाड/ अपघाताची शक्यता लक्षात घेऊन फिरती दुरुस्ती व गस्त पथके तैनात करण्यात यावी. परिसरातील सर्व बसस्थानके, जादा वाहतूक नियंत्रण केंद्राच्या जागी प्रवाशांसाठी पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय करण्यात यावी. बसेसच्या स्वच्छतेकडे तसेच फेऱ्यांच्या नियमिततेकडे लक्ष पुरविण्यात यावे व जादा बसेसवर "दिवाळी जादा" असा उल्लेख करण्यात यावा. जादा वाहतुकीच्या कालावधीत आगार व्यवस्थपकांना जादा वाहतूक करतांना मदत व्हावी म्हणून विभागीय कचेरीतील अधिकाऱ्यांच्या (पालक अधिकारी) नेमणूक करण्यात याव्यात तसेच जिल्हा मुख्यालयाच्या बसस्थानकावर गर्दीच्या कालावधीत प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी "प्रवासी मित्र" बिल्ला लावलेले कर्मचारी नियुक्त करावेत.