मुंबई - ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट असोसिएशनने जीएसटीमधील काही धोरण, डिझेल दरवाढ आणि आरटीओचा भ्रष्टाचार या तीन मुद्यांविरोधात 9 व 10 ऑक्टोबरला देशव्यापी चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबईतील वाहतुकदारांच्या बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रीय स्तरावर हे चक्काजाम आंदोलन 9 ऑक्टोबरला सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार असून ते दुस-या दिवशी 10 ऑक्टोबरला 8 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. मुंबई प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बीजीटीएचे प्रवक्ते महेंद्र आर्य यांनी चक्काजाम आंदोलनाची माहिती दिली.
पत्रकार परिषदेत महेंद्र आर्य म्हणाले की, नोटाबंदी आणि कॅशलेस व्यवहाराचे संघटनेने याआधीच स्वागत केले. मात्र जीएसटीमधील काही धोरणांचा प्रतिकूल परिणाम मालवाहतुकीवर होत आहे. त्यात वापरलेल्या व्यापारी मालमत्तेच्या विक्रीवरही सरकार जीएसटी आकारत आहे. त्यामुळे सरकारला दुप्पट जीएसटी मिळत असून वाहतूकदारांचे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर या चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले आहे.