दहावी पास तरुणाकडे सव्वा दोन कोटींचे चरस; मुंब्राच्या ड्रग्ज तस्कर जाळ्यात, एएनसीची कारवाई
By मनीषा म्हात्रे | Published: November 5, 2023 07:39 PM2023-11-05T19:39:14+5:302023-11-05T19:39:37+5:30
गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वरळी युनिटने ही कारवाई केली आहे.
मुंबई : मुंबईत ड्रग्ज विरोधात धडक कारवाई सुरु असताना मस्जिद बंदर येथून २ कोटी ४० लाख किंमतीचा ८ किलो चरस साठा घेऊन आलेल्या मुंब्य्राच्या ड्रग्ज तस्कराला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. तो दहावी पास असून नुकतेच नोकरी सोडून ड्रग्ज तस्करीत सक्रिय झाल्याचे कारवाईत समोर आले. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वरळी युनिटने ही कारवाई केली आहे.
एएनसीचे पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव, वरळी कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदिप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल कदम व पथकाने ही कारवाई केली आहे. मुंबईत ड्रग्ज तस्करांविरोधात शोध मोहीम सुरु असताना, युसुफ मेहर अली रोड, मस्जीद बंदर याठिकाणी एक जण संशयास्पदरित्या फिरताना दिसला. पथकाने त्याला ताब्यात घेत झाडाझडती घेताच त्याच्याकडे ८ किलो चरसचा साठा मिळून आला. आंतरराष्ट्रीय बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत २ कोटी ४० लाख एवढी आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवत पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
एएनसीने दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आरोपी असून मुंब्रा परिसरात पत्नी आणि मुलासोबत राहतो. त्याची गुन्हेगारी पार्शवभूमी नसून नुकतेच वाईनशॉपची सेल्समनची नोकरी सोडून यामध्ये गुंतल्याचे समोर आले. मुंब्रा येथून आणलेले चरस मुंबईत ड्रग्ज पेडलरला विक्रीसाठी आणले होते. रविवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ८ नोव्हेम्बर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने हा साठा कुणाकडून व कसा मिळवला? या साखळीचे पाळेमुळे कुठपर्यंत रोवले आहे? याचा शोध एएनसीकडून घेण्यात येत आहे. यावर्षी आतापर्यंतच्या कारवाईत एएनसीन १९५ ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे.