- योगेश बिडवईमुंबई : दिवाळीत आठवडाभर बंद असलेले कांदा मार्केट सोमवारी सुरू झाल्यानंतर आशिया खंडातील सर्वांत मोठ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी कांद्याच्या भावात वाढ झाली. लासलगावला एक किलोचे सर्वसाधारण दर १९ रुपयांवरून २५ रुपये झाल्यानंतर मुंबईत भाजी विक्रेत्यांकडे एका दिवसात कांद्याचे दर ३० रुपयांवरून ४० रुपये किलो झाले. विशेष म्हणजे, लासलगावच्या शेतकऱ्याचा १७ रुपये किलो दराचा कांदा मुंबईत तब्बल अडीच पट जास्त किमतीने ५० रुपयांना विकला जात आहे.
लासलगाव बाजार समितीत सोमवारी शेतकरी हरिभाऊ चव्हाण यांनी साधारण पाच क्विंटल कांदा १,६९० रुपये दराने विकला. मात्र, मुंबईत यापेक्षा कमी प्रतीचा चोपडा कांदा ४० रुपये किलोने ग्राहकांना विकत घ्यावा लागत आहे. लासलगाव बाजार समितीत मंगळवारी कांद्याचे दर कमीत कमी (कमी दर्जाचा) आठ रुपये तर जास्तीत जास्त (निर्यातीसाठीचा माल) २९ रुपये किलो होता. मुंबईच्या फोर्ट भागातील भाजीबाजारापासून ठाणे, कल्याण डोंबिवलीच्या किरकोळ मार्केटमध्ये मंगळवारी कांद्याचे दर ४० ते ५० रुपये किलो होते.