Join us  

मोबाईलवर बोलताना गच्चीवरून पडली १९ वर्षीय तरुणी; नालासोपाऱ्यामधील सेंट्रल पार्क येथील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 12:19 PM

इमारतीचे काम सुरु असल्याने बांधलेल्या पत्र्यांमुळे इमारतीच्याच्या पहिल्या मजल्यावरील लोखंडी ग्रीलवर ती पडली.

(मंगेश कराळे)नालासोपारा - शहरात एक विचित्र घटना रविवारी संध्याकाळी समोर आली आहे. नालासोपाऱ्याच्या सेंट्रल पार्क परिसरातील रजनी अपार्टमेंटमध्ये राहणारी एक तरुणी मोबाईलवर बोलता बोलता गच्चीवरून खाली पडली. सुदैवाने या तरुणीचे प्राण वाचले असून तिला गंभीर दुखापत झाली आहे.

या विचित्र अपघातात जखमी झालेल्या तरुणीचे नाव श्रुती पांडे (१९) असे आहे. श्रुती रविवारी सायंकाळी इमारतीच्या गच्चीवर मोबाईलवर बोलत होती. अचानक तिच्या हातातून मोबाईल सटकला आणि खाली पडला. मोबाईल पकडण्याच्या नदात श्रुतीचा तोल गेला आणि ती खाली पडली. इमारतीचे काम सुरु असल्याने बांधलेल्या पत्र्यांमुळे इमारतीच्याच्या पहिल्या मजल्यावरील लोखंडी ग्रीलवर ती पडली.

अगदीच अडगळीची जागा असल्याने या ठिकाणाहून बाहेर निघण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नसल्याने ती या ठिकाणी अडकून पडली. तिने मदतासाठी आरडाओरड केल्यानंतर इमारतीमधील रहिवाशांचे तिच्याकडे लक्ष गेले. त्यानंतर इमारतीमधील इतर रहिवाशांनी अग्निशमन विभागाला फोन करुन घडलेल्या घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचेपर्यंत या तरुणीला मदत करण्यासाठी काही तरुण या पत्र्यावर चढले. तरुणीच्या हाताला आणि पायाला मार लागल्याने तिला पत्र्यावरुन सुखरुप बाहेर काढण्यासाठी पहिल्या मजल्यावरील या पत्र्याच्या शेडजवळच्या सदनिकेची ग्रील तोडण्याशिवाय इतर पर्याय उपलब्ध नव्हता.

रहिवाशांकडून फोनवरुन या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वसई-विरार अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोचले. या जवानांनी स्प्रेड कटर मशीनच्या मदतीने ग्रील तोडून मुलीला बाहेर काढले व जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या तरुणीच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. 

टॅग्स :अपघातमोबाइल