मुंबई - भारतीय नौदलात अग्निवीर पदावर कार्यरत असलेल्या २० वर्षीय युवतीने टोकाचे पाऊल उचलून जीवनयात्रा संपवली. अग्निवीरचे प्रशिक्षण घेत असलेल्या या तरुणीने मुंबईत आत्महत्या केली. अपर्णा नायर अशी या तरुणीची ओळख पटली असून भारतीय नौदलाच्या जहाँजावर ती अग्निवीरचे प्रशिक्षण घेत होती. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी माहिती दिली आहे.
अपर्णा हिच्या आत्महत्येची माहिती मिळताच नौसेना दलाच्या डॉक्टरांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, अपर्णाची तपासणी करुन तिला मृत घोषित केले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून या आत्महत्येप्रकरणी सखोल तपास सुरू आहे. या घटनेनंतर अग्निवीर अमृतपाल याने गेल्याच महिन्यात केलेल्या आत्महत्येचा मुद्दा समोर आला. कारण, अमृतपाल यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवास सैन्य दलाकडून सन्मान न मिळाल्याने वाद निर्माण झाला होता. स्वत: राहुल गांधींनीही यावर भाष्य केलं होतं.
दरम्यान, अमृतपाल याच्या आत्महत्येनंतर सैन्य दलाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. अमृतपालने स्वत:च्या बंदुकीने गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. त्यामुळे, सैन्य दलातील अग्निवीरच्या नियमावलीनुसार त्यांना सैन्य दलाकडून सन्मान देण्यात आला नव्हता.
अग्नीपथ योजनेंतर्गत होत असलेल्या अग्निवीर भरतीलाही विरोधकांनी मोठा विरोध केला होता. सैन्य दलात कंत्राटी पद्धतीनो भरती होत असल्याचा आरोप करत, ४ वर्षानंतर अग्निवीर सैन्यातील तरुणांनी-तरुणींनी पुढे काय करायचं, असा सवालही विचारला होता. कारण, अग्निवीर भरतीप्रक्रियेतून सैन्य दलात भरती होणाऱ्यांना ४ वर्षे नोकरी देण्यात आली आहे. ४ वर्षानंतर त्यांना निवृत्ती देण्यात येत आहे. त्यामुळे, ह्या भरतीप्रक्रियेला मोठा विरोध झाला होता.