लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: जोधपूर ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या तोहिली बानो (२२) या गर्भवती महिलेने बोरिवली स्थानकात असलेल्या अपेक्स हॉस्पिटल व पश्चिम रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने असलेल्या इमरजेंसी मेडिकल रूममध्ये स्वस्थ व निरोगी बाळाला जन्म दिला. मुंबईमध्ये अशा प्रकारची ही दुसरी प्रसुती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपेक्स हॉस्पिटलचे ईएमआर प्रमुख व जेष्ठ फिजिशियन डॉ. उमेश गायकवाड यांनी 'लोकमत'ला दिलेल्या माहितीनुसार, आठ महिन्यांची गरोदर असलेली ही महिला बाळंतपणासाठी मुंबईला येत होती. तिच्यासोबत तिचे पतीही होते. मात्र विरार स्थानक पार झाल्यानंतर त्यांच्या पोटात कळा सुरु झाल्या. त्यामुळे ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ७च्या सुमारास हा निर्णय घ्यावा लागला.
महिलेला कळा सुरू झाल्यानंतर तिच्या पतीने कॅन्टीनमध्ये काम करीत असलेल्या कर्मचाऱ्याला याबाबत सांगितले. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सदर डब्यामध्ये ड्युटीवर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बोरिवली स्थानकात कळविले. तेव्हा बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम व पोलीस उपनिरीक्षक जयश्री मुलगीर यांच्या टीमने आरपीएफ व इतर सुरक्षा रक्षकांच्या मदतीने बोरिवली स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ येथे अपेक्स हॉस्पिटलच्या मेडिकल रूममध्ये या महिलेला आणण्यात आले. यावेळी डॉ. गायकवाड, डॉ लखीचंद प्रजापती, डॉ. पंकज राय, परिचारिका रेखा परमार व सविता चौधरी यांनी यशस्वीरीत्या या महिलेची प्रसूती केली. तिने एका स्वस्थ आणि निरोगी बाळला जन्म दिला. बाळाची व आईची तब्येत चांगली असून त्याना शताब्दी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. अपेक्स हॉस्पिटल व पश्चिम रेल्वे यांचा संयुक्तिक रित्या फलाट क्रमांक ३ येथे दवाखाना असून अपघात उपचार , वैद्यकिय तपासण्या व इतर अत्यावश्यक वैद्यकीय सेवा दिल्या जातात. अपेक्स हॉस्पिटल समूहाने सामाजिक बांधिलीकीमधून पश्चिम रेल्वे सोबत गेली ४ वर्षे हा उपक्रम राबवित आहेत. या उपक्रमातून हजारो प्रवाशांना अल्प दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे.
पोटात कळ आल्यानंतर ४५ मिनिटाच्या आता या महिलेची सुरक्षित प्रसूती करण्यात आली यासाठी जीआरपी कैलास शहाणे, सुशांत शिंदे, देवेंद्र शिंदे, सागर नागटिळक स्न्हेल गावडे, होमगार्ड राणी बोरूले, सिद्धेश कदम, पोलीस कॉन्स्टेबल जोतिराम खोटे व बोरीवली स्टेशन मास्तर भारतभूषण काकेरा व स्टेशन सुप्रिडेंट रजाक शेख यांनी विशेष सहकार्य केले.