जवळ आले, तोंड दाबलं अन् नंतर...; मुंबईत CSMT रेल्वे स्थानकाजवळ महिलेवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 12:45 PM2024-10-04T12:45:41+5:302024-10-04T12:47:35+5:30
Mumbai Crime news: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाजवळ एका महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे.
Mumbai News in Marathi:मुंबईतील वर्दळीचं ठिकाण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाबाहेर एका २९ वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. दोन आरोपींनी महिलेला स्थानकाबाहेरील टॅक्सी स्टॅण्ड मागे नेत आळीपाळीने बलात्कार केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २२ सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोहमार्ग रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण माता रमाबाई मार्ग पोलीस ठाण्यात वर्ग केला.
सीएसएमटी स्थानकाबाहेर २२ सप्टेंबर रोजी काय घडले?
२२ सप्टेंबरच्या रात्री महिला छत्रपती शिवाजी महाराज स्थानक परिसरात उभी होती. त्यावेळी दोन व्यक्ती तिथे आले.
काही कळण्याच्या आतच एका आरोपीने महिलेचे तोंड दाबले. आरडा-ओरड करून नये म्हणून आरोपींनी तसे केले. त्यानंतर दोन्ही आरोपी पीडित महिलेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाबाहेर टॅक्सी स्टॅण्डच्या पाठीमागे घेऊन गेले.
दोन्ही आरोपींनी तिथे महिलेला धमकावले आणि आळीपाळीने अत्याचार केले. या घटनेनंतर महिलेने रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली. छत्रपती शिवाजी महाराज लोहमार्ग पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. हे प्रकरण आता तपासासाठी माता रमाबाई मार्ग पोलिसांकडे वर्ग केले आहे.