अटल सेतू थेट वांद्रे-वरळी सी लिंकला जोडणार! प्रभादेवी रेल्वे स्थानकावर ३ हजार मेट्रिक टनाचा पूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 12:33 IST2025-02-05T12:31:46+5:302025-02-05T12:33:10+5:30
डॉ. आंबेडकर रस्ता ते प्रभादेवी येथील सेनापती बापट मार्गादरम्यान जगन्नाथ भातणकर मार्ग या कामासाठी १२ महिन्यांसाठी बंद केला जाईल.

अटल सेतू थेट वांद्रे-वरळी सी लिंकला जोडणार! प्रभादेवी रेल्वे स्थानकावर ३ हजार मेट्रिक टनाचा पूल
मुंबई : अटल सेतूची थेट वांद्रे-वरळी सी लिंकला जोडणी करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वरळी शिवडी उन्नत मार्गिकेसाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावर ३ हजार मेट्रिक टन वजनाच्या आणि ९५ मीटर लांब डबलडेकर पूल उभारला जाणार आहे. डॉ. आंबेडकर रस्ता ते प्रभादेवी येथील सेनापती बापट मार्गादरम्यान जगन्नाथ भातणकर मार्ग या कामासाठी १२ महिन्यांसाठी बंद केला जाईल, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
शिवडी- न्हावाशेवा अटल सेतूवरून आलेल्या वाहनांना विनाअडथळा वरळी आणि तेथून पुढे दक्षिण मुंबई, तसेच वांद्रे दिशेला जाता यावे यासाठी ४.५ किमी लांबीचा उन्नत मार्ग एमएमआरडीएकडून उभारला जात आहे. त्याच्या कामाला २०२१ मध्ये सुरुवात झाली होती. त्यानुसार जानेवारी २०२४ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र सद्यस्थितीत या मार्गाचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे.
परळला प्रत्येकी दोन लेनचा मार्ग; वरळीत २०९ मीटरचा अप्रोच रोड
एमएमआरडीएकडून परळ येथे स्थानिक वाहतुकीसाठी प्रत्येकी दोन लेनचा मार्ग उभारला जाईल. त्यावरून वरळी-शिवडीचा प्रत्येकी २ लेनचा मार्ग जाईल. त्यासाठी २५ मीटर आणि ३७मीटर लांबीचे दोन सुपरस्ट्रक्चर उभारण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये स्थानिक वाहतुकीसाठी उभारल्या जाणाऱ्या रस्त्यावर परळच्या बाजूला १५६ मीटर, तर वरळीच्या बाजूला २०९ मीटर लांबीचा अप्रोच रस्ता असेल.
पुलाच्या पाडकामासाठी ८०० टन वजनाची क्रेन
प्रभादेवी आणि परळ भागाला जोडण्यासाठी जगन्नाथ भातणकर मार्गावर प्रभादेवी रेल्वे स्थानकावर १०० वर्षे जुना पूल आहे. मध्य व पश्चिम रेल्वेवरून जाणारा हा पूल प्रत्येकी दीड लेनचा आणि १३ मीटर रुंदीचा आहे. वरळी शिवडी उन्नत मार्गिकेच्या कामासाठी हा पूल तोडण्यात येईल. त्यासाठी ८०० मेट्रिक टन वजनाच्च्या क्रेनचा वापर होईल.
अशी होणार पुलाची उभारणी
प्रभादेवी रेल्वे स्थानकावर उभारण्यात येणाऱ्या ३ हजार मेट्रिक टन वजनाच्या पुलाची जोडणी प्रकल्पस्थळावर केली जाणार आहे. त्यानंतर 'पूल अँड पुश मेथड'द्वारे पुलाची मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गावर उभारणी केली जाईल.