Join us

सांडपाणी शुद्धीकरणाच्या टाकीत सापडले ४ ते ५ महिन्यांचे अर्भक

By मनीषा म्हात्रे | Published: April 07, 2024 6:28 PM

याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे.

मुंबई :अंधेरीतील वसंत ओएसिस कॉम्प्लेक्सच्या सांडपाणी शुद्धीकरणाच्या टाकीत चार ते पाच महिन्यांचे अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

दहिसर येथील रहिवासी असलेले सुजित लालताप्रसाद यादव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. यादव यांच्या तक्रारीनुसार, शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास कॉम्पलेक्स बेसमेंट ९ येथील सांडपाणी शुध्दीकरण टाकीकडे काम करत असताना, इमारतीतून येणाऱ्या सांडपाण्यामधून अंदाजे ४ ते ५ महिन्याचे अर्भक आढळून आले.

त्यांनी याबाबत तात्काळ सोसायटीतील पदाधिकाऱ्यांना सांगून तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अर्भक ताब्यात घेत कूपर रुग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. महिलेने बाळाच्या जन्माची माहिती लपविण्याचा उद्देशाने फेकून दिल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे.

टॅग्स :अंधेरीमुंबई