Join us

मुंबईतील इमारतीच्या थेट १३व्या मजल्यावर पोहचला ४ फुटांचा अजगर; रहिवाशी चक्रावले...!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 11:02 AM

मुंबईतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुंबई: मुंबईतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे घाटकोपर (पश्चिम) परिसरात एका इमारतीच्या १३व्या मजल्यावर चार फुटांचा अजगर आला होता. प्राणीप्रेमींनी याबाबत वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनविभागाने त्याची सुटका केली. तिथे राहणाऱ्या लोकांनाही आश्चर्य वाटले की अजगर इमारतीच्या इतक्या उंचीवर कसा पोहोचला.

मुंबईतील एका आयटी फर्मसाठी काम करणारे प्राणी कार्यकर्ते सूरज साहा यांनी सांगितले की, मंगळवारी घाटकोपर (पश्चिम) एलबीएस रोडवरील व्रज पॅराडाईज इमारतीच्या टेरेसवर भारतीय रॉक अजगर दिसला. टेरेसवर काही बांधकाम सुरू असल्याने अजगर पूर्णपणे सिमेंटमध्ये अडकला होता. त्याला वाचवण्यासाठी आम्ही तातडीने राज्याच्या वनविभागाशी संपर्क साधला.

साहा म्हणाले की, संरक्षित वन्यजीव प्रजाती असलेल्या अजगराला वाचवण्यासाठी मुंबई परिक्षेत्र वन अधिकारी राकेश भोईर यांचे पथक घटनास्थळी पोहोचले होते. साहा म्हणाले, "अजगर पाहिल्यानंतर कोणीही त्याला इजा करण्याचा प्रयत्न केला नाही ही चांगली गोष्ट आहे. वन्यजीवांच्या जनजागृतीमुळे लोकांना कळले की सापांना इजा करणे किंवा मारणे बेकायदेशीर आहे."

साप निवासी भागात का येतात?

वन्यजीव तज्ज्ञांनी सांगितले की, मुसळधार पावसात सापांच्या जातीचे बिळे पाण्याने भरतात. त्यामुळेच ते निवासी भागात उंच जागा शोधत इमारतींच्या छतावर पोहोचतात. शिवाय, भारतीय रॉक अजगर जंगलात उत्कृष्ट गिर्यारोहक म्हणून ओळखले जातात कारण ते झाडांवर आणि अगदी खडकाच्या पृष्ठभागावर सहज चढू शकतात.

टॅग्स :मुंबई