केईएम हाॅस्पिटलच्या बेफिकीरीमुळे ५२ दिवसांच्या चिमुकल्याचा हात कापावा लागला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 06:34 AM2023-08-12T06:34:36+5:302023-08-12T12:04:16+5:30

हाताला सलाईन देण्यासाठी हाताला जी सुई लावली जाते, त्याद्वारे (जेल्को) औषधे दिली जात होती.  

A 52-day-old baby's hand had to be amputated due to the carelessness of KEM Hospital | केईएम हाॅस्पिटलच्या बेफिकीरीमुळे ५२ दिवसांच्या चिमुकल्याचा हात कापावा लागला

केईएम हाॅस्पिटलच्या बेफिकीरीमुळे ५२ दिवसांच्या चिमुकल्याचा हात कापावा लागला

googlenewsNext

- संतोष आंधळे 
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : के. ई. एम. रुग्णालयात मुदतपूर्व प्रसूतीने जन्माला आलेल्या अवघ्या ५३ दिवसांच्या बाळाचा हात रुग्णालयातील निष्काळजीपणा व टोकाच्या बेफिकिरीमुळे कापण्याची वेळ आली आहे. यामुळे मुलाचा हात तर गेला; किमान बाळ तरी सुरक्षित परत द्या, असा उद्विग्न टाहो बाळाच्या पालकांनी फोडला आहे.

अश्विनी चव्हाण यांची मुदतपूर्व प्रसूती १९ जून रोजी के. ई. एम. रुग्णालयात झाली व त्यांना झालेला हा मुलगा सहा महिने १० दिवसांचा असून त्याचे वजन (१ किलो २६ ग्रॅम) असे फारच कमी असल्यामुळे त्याला नवजात शिशुदक्षता विभागात ठेवले आहे. तेथे त्याच्या हाताला सलाईन देण्यासाठी हाताला जी सुई लावली जाते, त्याद्वारे (जेल्को) औषधे दिली जात होती.  

दि. १५ जुलै रोजी जेल्को वापराच्या निष्काळजीमुळे बाळाचा हात निळा पडू लागल्याने बाळाच्या आईने डॉक्टरांना कळविले, मात्र ‘ते होईल बरे’ असे त्यांना सांगण्यात आले. दुसऱ्या दिवसापर्यंत हात आणखी निळा-काळसर झाला. आईचा संशय बळावला. त्यांनी दुसऱ्या दिवशी डॉक्टरांना पुन्हा सांगितल्यानंतर सलाईनची ती सुई काढली. नवजात शिशू विभागाच्या प्रमुख डॉ. अनीथा अनंथन यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यांनीसुद्धा हात बरा करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. मात्र दिवसागणिक हात खूपच काळा पडून हाताची बोटे वाकडी झाली होती. डॉक्टरांनी अखेर हाताचा संसर्ग बळावल्याने बाळाचा उजवा हात कोपरापासून कापावा लागेल, असे चव्हाण कुटुंबीयांना कळविले. 

बाळाचे वडील राहुल चव्हाण नालासोपारा येथे रिक्षा ड्रायव्हर आहेत. ते ‘लोकमत’शी म्हणाले, माझ्या बायकोने १५ जुलै विभागातील डॉक्टरला वेळीच कळविले होते, तेव्हा  डॉक्टरांनी प्रयत्न केले असते तर बाळाचा हात कापण्याची वेळ आली नसती. संसर्ग होऊन बाळाचा हात गेला आहे. आता किमान बाळ तरी आम्हाला घरी नेता यावे, ही आमची विनंती आहे. आम्ही कोणाला जबाबदार धरावे? असा सवाल त्यांनी केला. बाळाला  डिस्चार्ज मिळण्यासाठी १५-२० दिवस लागतील, असे सांगण्यात येत आहे.

या विषयावर तुम्ही अधिष्ठात्यांशी बोलून घ्यावे. मी आपल्याशी या विषयावर बोलू शकत नाही.  
- डॉ. अनिथा अनंथन, नवजात शिशू विभागप्रमुख, के. ई. एम. रुग्णालय

रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांना वारंवार फोन करून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही.

या प्रश्नांची उत्तरे कोण देणार ? 
n आईने ज्यावेळी चूक निदर्शनास आणून दिली त्यावेळी त्याची दखल का घेतली गेली नाही ?
n हात काळा होईपर्यंत उपचार का दिले गेले नाहीत? दिले तर कधी दिले?
n गंभीर घटनेची माहिती अधिष्ठात्यांना मिळाली का? त्यांनी काय केले? 
n यात निष्काळजीपणा कुणाचा? त्यावर कारवाई काय करणार? 
n महापालिका मुलाच्या आईवडिलांना नुकसानभरपाई देणार का? 
n या प्रकरणाची सखोल चौकशी कोण करणार?
n ज्या बाळाचा हात कापावा लागला ते एका गरीब रिक्षावाल्याचे बाळ आहे. एखाद्या श्रीमंताचे किंवा उपद्रव मूल्य असणाऱ्याचे ते बाळ असते तर महापालिकेची भूमिका काय राहिली असती..?

Web Title: A 52-day-old baby's hand had to be amputated due to the carelessness of KEM Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.