मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या 62 वर्षीय महिलेचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू, मुंबईतील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 03:51 PM2022-11-02T15:51:15+5:302022-11-02T15:54:34+5:30
मुंबईतील चारकोप येथे मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या 62 वर्षीय महिलेचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाला.
मुंबई : लिफ्टमध्ये अडकून मृत्यू होण्याचे सत्र सुरूच आहे. मागील काही दिवसांमध्ये मुंबईतील 2 जणांनी लिफ्टमुळे आपला जीव गमावला आहे. मुंबईतील मानखुर्द (Mankhurd) परिसरात 28 ऑक्टोबर रोजी लपाछपी खेळत असलेल्या एका तरुणीच्या डोक्यावर लिफ्ट पडून तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे. ही घटना ताजी असतानाच मुंबईतील कांदिवली पश्चिम चारकोप परिसरात निवासी इमारतीत लिफ्ट कोसळून एका 62 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. मॉर्निंग वॉकसाठी महिला लिफ्टमधून चौथ्या मजल्यावरून खाली जात असताना 21 ऑक्टोबर रोजी चारकोप परिसरातील एका बहुमजली इमारतीत ही घटना घडली असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. चारकोप पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला लिफ्टमध्ये उतरताच ती तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या मध्येच अडकली. महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केला आणि जेव्हा तिच्या मुलाने लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला विजेचा धक्का बसला, त्यामुळे वीजपुरवठा देखील खंडित झाला.
My mother, a 62 year old woman lost her life while using the residential building’s lift at Charkop area of Kandivali West on 21st October’22. The lift had a free-fall from the 4th floor to the ground. #liftaccident#Charkop#highlandbreeze#Kandivali#Mumbai#brutaldeathpic.twitter.com/DM6RQRK4NS
— sachindra p (@p_sachindra) October 28, 2022
डॉक्टरांनी केली अपघाती मृत्यूची नोंद
यानंतर इमारतीच्या एका सुरक्षा रक्षकाने लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र तोही विजेच्या धक्क्याने खाली पडला. महिलेला गंभीर दुखापत झाली आणि तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. चारकोप पोलिसांनी नंतर या घटनेच्या संदर्भात अपघाती मृत्यूची नोंद केली. अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.
16 वर्षीय तरूणीचाही लिफ्टने घेतला जीव
मुंबईतील मानखुर्द (Mankhurd) परिसरात लपाछपी खेळत असलेल्या एका तरुणीच्या डोक्यावर लिफ्ट पडून तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील मानखुर्द परिसरात शुक्रवारी 28 ऑक्टोबर रोजी लपाछपीचा खेळ खेळत असताना लिफ्ट अंगावर पडल्याने एका 16 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तिच्या निवासी सोसायटीच्या अध्यक्ष व सचिवाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे. रेश्मा खरवी असे मृत मुलीचे नाव आहे. ती तिच्या मित्रमंडळीसोबत लपाछपी खेळत होती. खेळताना रेश्माची पाळी जेव्हा मित्रांना शोधायची आली तेव्हा तिने एका खिडकीत डोकावून पाहिलं जी खिडकी थेट लिफ्टमध्ये उघडते. रेश्माने डोके आत घालताच लिफ्ट आली आणि दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला.