Join us

तो मित्र निघाला ठग अन्...! बोरिवलीतील ६७ वर्षीय आजोबांची फसवणूक 

By मनीषा म्हात्रे | Published: February 19, 2024 6:26 PM

आजोबांना मित्र बोलत असल्याची बातवणी करत सायबर ठगानेएक लाख ६० हजार रुपयांना ऑनलाईन गंडविले आहे.

मुंबई: बोरिवलीतील ६७ वर्षीय आजोबांना मित्र बोलत असल्याची बातवणी करत सायबर ठगानेएक लाख ६० हजार रुपयांना ऑनलाईन गंडविले आहे. वडील आजारी असल्याचे सांगून उपचारांसाठी पैशांची मागणी करत त्याने ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी अज्ञात सायबर भामट्याविरोधात कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बोरिवली पूर्वेकडील सिध्दार्थनगर परिसरात राहण्यास आजोबांच्या तक्रारीनुसार, ७ फेब्रुवारीच्या सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्यांना एका अनोळखी नंबरवरुन कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने तक्रारदार यांना त्यांचा मित्र बोलत असल्याचे भासवले. 

त्यानंतर त्याने वडिलांना उपचारांसाठी रुग्णालयात आणल्याचे सांगून तीन दिवसांत त्यांच्याकडून एकूण एक लाख ६० हजार १०० रुपये उकळले. तक्रारदार यांच्या लहान मुलीच्या विवाह सोहळ्यात त्यांची या मित्राशी भेट झाली. तक्रारदार यांनी त्याला वडिलांच्या तब्येतीबाबत विचारणा केली. त्यावर त्या मित्राने वडील हे आजारी नसून घरीच असल्याचे सांगितले. हे ऐकून तक्रारदार यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी घडलेला प्रकार मित्राला सांगितला. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांच्या १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर आणि कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.

टॅग्स :मुंबईबोरिवली