मुंबई : 'त्या' व्यक्तीची हत्या विनयभंगाच्या प्रकरणातून, १६ वर्षीय युवतीने मित्राच्या मदतीने घेतला जीव

By धीरज परब | Updated: March 15, 2025 23:23 IST2025-03-15T23:20:48+5:302025-03-15T23:23:19+5:30

भाईंदरच्या उत्तन भागात एका ७५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. त्याचा तपास केल्यानंतर वेगळीच कहाणी समोर आली.

A 75-year-old man was murdered by a 16-year-old girl with the help of a friend for molesting her in Mira Road | मुंबई : 'त्या' व्यक्तीची हत्या विनयभंगाच्या प्रकरणातून, १६ वर्षीय युवतीने मित्राच्या मदतीने घेतला जीव

मुंबई : 'त्या' व्यक्तीची हत्या विनयभंगाच्या प्रकरणातून, १६ वर्षीय युवतीने मित्राच्या मदतीने घेतला जीव

-धीरज परब, मीरारोड 
विनयभंग केल्याच्या कारणावरून अल्पवयीन मुलीनेच तिच्या १७ वर्षीय अल्पवयीन मित्रासह मिळून ७५ वर्षीय वृद्ध इसमाची डोक्यात लादी व दगडाने मारून हत्या केली. हत्येनंतर मृतदेह झुडपात फेकून दिला. ही घटना भाईंदरच्या उत्तन भागात घडली आहे. पोलिसांनी आरोपी मुला-मुलीस ताब्यात घेऊन भिवंडी येथील बाल सुधारगृहात ठेवले आहे.

भाईंदरच्या उत्तन-चौक येथील बालेपीर शाह दर्गा लगतच्या झुडपात एका वृद्ध व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळून आल्याचे माजी नगरसेवक अमजद शेख यांनी उत्तन पोलिसांनी २२ फेब्रुवारी रोजी कळवले होते. पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. वृद्ध व्यक्ती स्वच्छतागृहात जाताना तोल जाऊन पडला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. 

सीसीटीव्ही फुटेज बघितले अन्...

नायगाव पोलीस ठाण्यात किशोर ब्रिजमोहन मिश्रा (रा. गणपत पाटील नगर, लिंक रोड, बोरिवली पश्चिम) या ७५ वर्षीय वृद्ध व्यक्तीच्या बेपत्ता होण्याची नोंद १६ फेब्रुवारी रोजी झाली होती. मिश्रा यांचे नायगावला छोटे दुकान होते. पोलीस हवालदार देविदास पाटील यांनी मिश्रा यांचा शोध सुरु केला होता. 

सीसीटीव्ही फुटेजमध्ये मिश्रा हे १५ फेब्रुवारीच्या रात्री उशिरा त्यांच्या दुकानात काम करणाऱ्या १६ वर्षीय मुलीसह नायगाव रेल्वे स्थानकात लोकल पकडताना दिसले. मात्र ते कोणत्या स्थानकात उतरले हे समजले नाही. 

मिश्रा यांचा मोबाईल १६ फेब्रुवारी रोजी बंद होता, पण त्यांचे लोकेशन भाईंदर परिसरात होते. पाटील यांनी मोबाईल क्रमांक आणि बँक स्टेटमेंटवरून मिश्रा यांच्या खात्यातून वळती झालेली रक्कम याची माहिती घेतली. 

मोबाईल कॉल आणि पैशांचा व्यवहार

मोबाईल कॉल व पैशाचा व्यवहार या वरून तपास सुरु केला. काही जणांची चौकशी व माहिती नंतर भाईंदर पूर्व येथील आरोपी अल्पवयीन मुलाचे घर गाठले. मात्र तो घरी नव्हता व मोबाईल बंद होता. 

त्याच्या वडिलांना विश्वासात घेतल्यानंतर मुलास नायगाव रेल्वे स्थानक येथून ताब्यात घेतले. हत्येनंतर तो मुलीसह नायगाव येथील खोलीत लपून असल्याचे सांगितल्याने तिला सुद्धा ताब्यात घेतले. पोलिसांनी दोघांची चौकशी केली असता, दीड महिन्यापूर्वी मुलगी मिश्राच्या दुकानात कामास लागली होती व त्याने सदर खोलीत तिला ठेवले होते. 

५ हजार पगार सांगून त्याने न दिल्याने मिश्रा यांच्या मोबाईलमधून काही रक्कम तिने मित्राच्या बहिणीच्या नंबरवर पाठवली होती. मिश्रा पैसे परत मागून पोलिसात देण्याची भीती दाखवत असे. १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्री त्याने मुलीला भाईंदर येथे नेऊन रिक्षातून फिरवले व शारीरिक लगट करू लागला. 

त्यामुळे मुलीने भाईंदरमध्येच राहणाऱ्या १७ वर्षीय मित्रास कळवले. चौक येथील दर्गा जवळ मिश्रा यांने मुलीचे कपडे ओढू लागल्याने  मुलीसह तिच्या मित्राने मिश्रा यांच्या डोक्यात फरशी, दगड मारून हत्या केली व मृतदेह झुडपात फेकून दिला.  

हत्येचा प्रकार समोर आल्यानंतर हवा. देविदास पाटील यांनी १३ मार्च रोजी आरोपी मुलगा व मुलीला उत्तन सागरी पोलीस ठाण्याच्या हवाली केले. पोलिसांनी मुलीच्या फिर्यादी वरून पॉक्सो सह विनयभंगाचा गुन्हा मयत मिश्रा वर दाखल केला.  

तर उपनिरीक्षक शिवराम खरबे यांच्या फिर्यादी वरून अल्पवयीन मुला - मुलीवर हत्येचा गुन्हा दाखल केला. हत्येचा तपास वरिष्ठ निरीक्षक शिवाजी नाईक हे करत आहेत. या घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक आयुक्त दीपाली खन्ना यांनी घटनास्थळची पाहणी करत पोलीस ठाण्यात जाऊन माहिती घेतली.

Web Title: A 75-year-old man was murdered by a 16-year-old girl with the help of a friend for molesting her in Mira Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.