90 वर्षांच्या आजी घरासाठी 11 वर्षे लढल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 08:07 AM2022-08-14T08:07:51+5:302022-08-14T08:08:13+5:30
सत्र न्यायालयाने कांताबाईंना त्यांच्या हक्काच्या निवाऱ्याच्या बाजूने निकाल दिला. पतीनंतर घरावर कांताबाईंचा हक्क सर्वाधिक आहे. त्यामुळे त्यांना घरातून बाहेर काढता येणार नाही, असे न्यायालयाने सुनावले, आणि सुरकुतल्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य विलसले... गृहस्वातंत्र्य परत मिळाल्याची भावना त्या समाधानाच्या हास्यात नक्कीच होती.
- विनय उपासनी, मुख्य उपसंपादक
वयाची नव्वदी म्हणजे आरामखुर्चीवर बसून नातू-पणतूंचे कोडकौतुक करण्याचे, पाहण्याचे वय... ठणठणीत असाल तर घरच्यांच्या प्रेमळ धाकात राहत घरापासून नजीकच्या अंतरापर्यंत चक्कर मारण्याचे स्वातंत्र्य... पण, या वयात कोर्टाची पायरी चढणे म्हणजे समाजाच्या दृष्टीने ‘शुद्ध वेडेपणा’... इच्छा नसतानाही कांताबाईंना (मूळ नाव न छापण्याचे आदेश आहेत) कोर्टाची पायरी चढावी लागली. कारण, त्यांच्या डोक्यावरील हक्काचे छप्परच त्यांच्याकडून हिरावून घेतले गेले होते आणि तेही दुसऱ्यातिसऱ्याकडून नाही, तर स्वत:च्या पोटच्या गोळ्याकडूनच...
मुंबईच्या एका उपनगरात राहणाऱ्या ९० वर्षांच्या कांताबाईंच्या बाजूने सत्र न्यायालयाने अलीकडेच निकाल दिला. त्यांच्या हक्काच्या घरात राहण्याचा कांताबाईंना पुरेपूर अधिकार असून, त्यापासून त्यांना कोणी रोखू शकत नाही, असे न्यायालयाने ठासून सांगितले आणि कांताबाईंचा मुलगा आणि सून नरमले. कांताबाईंच्या २०११ पासून चाललेल्या न्यायालयीन लढ्याला पूर्णविराम मिळाला.
कांताबाई आणि त्यांच्या पतीने मोठ्या कष्टाने उपनगरात एका इमारतीत घर घेतले. याच घरात त्यांचा संसार फुलला. जीवनातील अनेक कडूगोड आठवणींच्या साक्षीदार त्या घराच्या भिंती राहिल्या. सन २००० मध्ये कांताबाईंच्या पतीचे निधन झाले.
पतीच्या निधनानंतर कांताबाईंच्या नशिबाचे वासेही फिरले. मुलगा आणि सून त्यांचा छळ करू लागले. पोलिसांत चारवेळा तक्रारही करून झाली. मात्र, ढिम्म फरक पडला नाही. आमच्या नावावर घर करून देत नाही तर घरातही राहायचे नाही, असे सांगत मुलगा आणि सुनेने कांताबाईंना घराबाहेर काढले. मुलगी आणि जावयाने त्यांना आसरा दिला. परंतु कांताबाईंना घराची ओढ स्वस्थ बसू देईना. कायदेशीर मार्गाने त्यांनी हक्क परत मिळविला.