Join us  

मोटरमनच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ, रेल्वे रुळावर लोखंडी ड्रम टाकून घातपाताचा प्रयत्न; भायखळ्यानजीकचा प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2022 9:20 AM

Mumbai Local: मध्य रेल्वेच्या  सीएसएमटी ते भायखळा  स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर दगडांनी भरलेला लोखंडी ड्रम रेल्वे रुळावर टाकून घातपात करण्याचा प्रयत्न गुरुवारी मोटरमनच्या सतर्कतेमुळे उधळला गेला. 

मुंबई : मध्य रेल्वेच्या  सीएसएमटी ते भायखळा  स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर दगडांनी भरलेला लोखंडी ड्रम रेल्वे रुळावर टाकून घातपात करण्याचा प्रयत्न गुरुवारी मोटरमनच्या सतर्कतेमुळे उधळला गेला. 

कोरोना सावटानंतर दोन वर्षांनी गणेशोत्सव मुंबईत सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. पाकिस्तानातून आलेल्या धमकी संदेशाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणाही सतर्क आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर भायखळा स्थानकात डाऊन जलद मार्गावर दगडांनी भरलेला लोखंडी ड्रम रुळावर ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला. गुरुवारी दुपारी ३ वाजून १० मिनिटांच्या खोपोली जलद लोकलने भायखळा स्थानकाजवळ गती पकडली. तेव्हा रेल्वे रुळावर दगडांनी भरलेल्या लोखंडी ड्रम मोटरमन अशोक शर्मा यांना दिसला. शर्मा यांनी इमर्जन्सी ब्रेक लावला आणि या घटनेची माहिती रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला दिली.

 ड्रममध्ये दगड आणि खडी  लोकल ड्रमला धडकली असती तर  गाडीचा जंपर, वायर इत्यादी तुटून पडले असते. ड्रममध्ये दगड आणि खडी होती.  भायखळा येथील आरपीएफ, ठाणे येथे कलम १५४ अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भायखळा ते सॅण्डहर्स्ट रोड स्थानकादरम्यान मला रुळावर दगडांनी भरलेला लोखंडी ड्रम दिसला. त्यानंतर मी आपत्कालीन ब्रेक लावून लोकल थांबवली. या घटनेची माहिती रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला दिली. प्रवाशांची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे.  - अशोक शर्मा, मोटरमन, मध्य रेल्वे

टॅग्स :मुंबई उपनगरी रेल्वे