दादरमधील स्विमिंग पूलमध्ये मगरीचे पिल्लू कुठून आले?; नवीन सीसीटीव्ही फुटेज आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 09:49 AM2023-10-05T09:49:26+5:302023-10-05T09:58:43+5:30
जलतरण तलावात आलेलं मगरीचं पिल्लू शेजारच्या प्राणी संग्रहालयातीलच स्पष्ट झालं आहे.
मुंबई: दादर येथील महात्मा गांधी ऑलिम्पिक जलतरण तलावात मंगळवारी एका मगरीचे पिल्लू आढळले. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. यानंतर स्विमिंग पूलाच्या बाजूलाच असलेल्या प्राणीसंग्रहालयातून हे मगरीचे पिल्लू आले असेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली. मात्र मगर आमच्या प्राणिसंग्रहालयातील नाही, असे संबंधित व्यवस्थापनाने सांगितले होते. परंतु याबाबत आता महत्वाचा पुरावा समोर आला आहे.
जलतरण तलावात आलेलं मगरीचं पिल्लू शेजारच्या प्राणी संग्रहालयातीलच स्पष्ट झालं आहे. याबाबतचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. त्यातून ही मगर शेजारीच असलेल्या प्राणीसंग्रहालयातून आल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता प्रशासन संबंधित प्राणीसंग्रहालयावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्राणीसंग्रहालयाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मगर सापडल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करून घेतला होता. मात्र आता मगर शेजारीच असलेल्या प्राणीसंग्रहालयातून आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्राणीसंग्रहालयाच्या मालकावर गुन्हा दाखल करावा, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. तसेच हे प्राणीसंग्रहालय नसून हा प्राणी तस्करीचा अड्डा असल्याचा आरोपही संदीप देशपांडे यांनी केला आहे.
हा घ्या पुरावा.मगर ही बाजूच्या प्राणी संग्रालयातूनच आली आहे. हे प्राणी संग्रालय नसून हा आहे प्राणी तस्करी चा अड्डा. pic.twitter.com/vZBjlauquJ
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 5, 2023
दरम्यान, मंगळवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास तरण तलावाची पाहणी केली जात असताना ऑलिम्पिक आकाराच्या व शर्यतीसाठीच्या जलतरण तलावात मगरीचे पिल्लू जलविहार करताना कर्मचाऱ्यांना आढळून आले. त्यानंतर सगळ्यांची एकच धावपळ उडाली. लगेचच मगर पकडण्यात तरबेज असणाऱ्यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी अथक प्रयत्न करून अखेर पिल्लाला पकडले. त्यानंतर वनविभागाकडे पिल्लू सोपविले. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास तरण तलावाची पाहणी केली जात असताना ऑलिम्पिक आकाराच्या व शर्यतीसाठीच्या जलतरण तलावात मगरीचे पिल्लू जलविहार करताना कर्मचाऱ्यांना आढळून आले. त्यानंतर सगळ्यांची एकच धावपळ उडाली. लगेचच मगर पकडण्यात तरबेज असणाऱ्यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी अथक प्रयत्न करून अखेर पिल्लाला पकडले. त्यानंतर वनविभागाकडे पिल्लू सोपविले.
मनसेची पालिका आयुक्तांकडे तक्रार
मगरीच्या पिल्लाप्रकरणी गोंधळ सुरु झाल्यानंतर मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे तेथे आले. संग्रहालय बेकायदा असून खासगी व्यक्ती संग्रहालय सुरूच कसे करू शकते, असा सवाल त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी पालिका आयुक्तांची भेट घेऊन तक्रार केली.