मुंबई : गर्भधारणा झाल्यापासून पुढचे नऊ महिने आई-बाबांसाठी अतिशय आनंदाचे आणि औत्सुक्याचे असतात. आनंदासोबतच विविध प्रश्न आणि काळजीदेखील सतावत असते. आपले बाळ कसे असेल? ते आरोग्यदृष्ट्या सुदृढ असेल ना, बाळाला जन्मत:च काही आजार किंवा व्यंग नसेल ना याची काळजीही भावी आई-बाबांना असते. गर्भात व्यंग असेल तर सोनोग्राफीद्वारे याचे योग्य निदान करता येते. यासाठी तीन महिन्यांतील सोनोग्राफी अत्यंत महत्त्वाची ठरत.
डेटिंग स्कॅनगरोदरपणातील पहिल्या सहा ते दहा आठवड्यांतील सोनोग्राफी करणे अनिवार्य असते. हा रुटीन चेकअपचा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. पहिल्या काही आठवड्यांत ज्या सोनोग्राफी चाचण्या केल्या जातात, त्यांना ‘डेटिंग स्कॅन’ असे म्हटले जाते. या सोनोग्राफीत गर्भाच्या हृदयाचे ठोके तसेच बाळाची व्यवस्थित वाढ होतेय की नाही, याबाबत समजू शकते. दरम्यान, गर्भवतीच्या बाबतीत तिच्या घरच्यांनी कुठल्याही प्रकारची हयगय करू नये असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.
ट्रान्सव्हिजनल सोनोग्राफीया चाचणीत गर्भलिंग पिशवी, हृदयाचे ठोके आणि गर्भाची भिंत यांची चाचणी या सोनोग्राफीत करण्यात येते. ओटीपोटाच्या स्कॅनमध्ये मूत्राशय पूर्णपणे भरलेले असणे आवश्यक असते. मूत्राशय पूर्ण भरल्यानंतर ओटीपोटावर जेल लावून गर्भाची तपासणी केली जाते.
एनटी सोनोग्राफीडाऊन सिंड्रोम, एडवर्ड्स सिंड्रोम, पॅन्टो सिंड्रोम किंवा इतर कुठले व्यंग तर बाळात नाहीत ना यासाठी एनटी सोनोग्राफी केली जाते. पहिल्या स्कॅननंतर बाळात काही व्यंग आहे की नाही, हे नीट समजले नाही तर काही अंतराने पुन्हा सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला जातो.
पहिल्या तीन महिन्यांत सोनोग्राफी का महत्त्वाची?- बाळाच्या हृदयाचे ठोके समजतात.- जुळे, तिळे किंवा तीनपेक्षा अधिक गर्भ आहे का, याची खातरजमा करता येते.- बाळंतपण नेमके कधी होणार, याची तारीख पहिल्या तिमाहीतील चाचण्यांतून काढता येते.- गर्भाची वाढ व्यवस्थित होतेय का? याची चाचपणी करता येते.- बाळात कुठले व्यंग तर नाही ना, याचीही तपासणी करता येते.
व्यंग नसलेले सुदृढ बाळ हवे असेल तर एम्ब्रीयो बायोप्सीचा पर्याय निवडता येऊ शकतो. आधीच्या बाळात जर व्यंग असेल तर दुसरे बाळ सुदृढ जन्माला यावे यासाठी काळजी घेतली जाते. त्यानुसार आवश्यक त्या चाचण्या करून घेतल्या जातात. आनुवंशिकतेतूनही बाळात व्यंग येऊ शकते, अशावेळी एम्ब्रीयो बायोप्सीद्वारे सुदृढ बाळ जन्माला घालता येते.-डॉ. आरती आढे, कन्सल्टंट, स्त्रीरोग तज्ज्ञ, हिंदूजा हॉस्पिटल