महामुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करतात. या लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी ही नेहमीचीच असल्याने प्रवासाच्या गडबडीत प्रवाशांच्या अनेक वस्तू हरवतात. मध्य रेल्वेवरील कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकलमध्ये सापडलेली अशीच एक बॅग सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कसाऱ्याकडे जाणाऱ्या या लोकलमध्ये सापडलेल्या एका बेवासर बॅगमध्ये तब्बल २० लाख रुपये एवढी रक्कम असल्याचं समोर आलं आहे.
याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कसाऱ्याकडे निघालेली लोकल कल्याण स्टेशनवर आली असताना प्रवाशांनी लोकलमध्ये एक बेवारस बॅग दिसून आली. त्यानंतर प्रवाशांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी सदर बॅग तपासून पाहिली असता त्यामध्ये २० लाख रुपये असल्याचे दिसून आले. बॅगेमध्ये ५०० रुपयांच्या नोटांची एकूण ७ बंडलं पोलिसांना सापडली. त्याशिवाय बॅगेमध्ये काही औषधांचे बॉक्सही सापडले.
त्यानंतर पोलिसांना पंचनामा करून ही बॅग ताब्यात घेतली आहे. तसेच या बॅगेच्या मालकाचा शोध सुरू केला आहे. तसेच बॅगेमध्ये असलेली ही रक्कम वैध होती की अवैध होती. तसेच ती कोण आणि कुठे घेऊन जात होता, याचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.