मुंबई-
राज्याच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. कंबोज यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लक्ष्य करत आहेत. राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता तुरुंगात जाणार असल्याचं ट्विट करत कंबोज यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर रोहित पवार यांच्यावर निशाणा साधत त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. आता कंबोज यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. 'विद्या ताई जय श्री राम', असं ट्विट कंबोज यांनी केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना विद्या चव्हाण यांनी कंबोज यांच्याबोबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. निवडणूक काळात पैसे वाटपाच्या आरोपावेळी फडणवीसांच्या एका फोनमुळे मोहित कंबोजची सुटका झाली होती असा आरोप विद्या चव्हाण यांनी केला आहे.
“भाजपचे बरेच नेते माझ्या ओळखीचे आहेत. पण मोहित कंबोज कोण त्यांना मी ओळखत नाही. ते माझ्या परिचयाचे नाहीत. एका निवडणुकीदरम्यान मी दिंडोशी-मालाडमध्ये होते. तेव्हा नोटांनी भरलेली बॅग पोलिसांनी पकडली होती. आमचे कार्यकर्ते त्यांच्या विरोधात आक्रमक झाले होते. ती बॅग घेऊन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनला आले होते. पण तेव्हा तत्कालिन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला की, ते भाजपचे कार्यकर्ते आहेत. तेव्हा मला कळालं की हे मोहित कंबोज आहेत आणि ते भाजपचे नेते आहेत. फडणवीसांकडे गृहखातं असल्यामुळे ते वाचले”, असा किस्सा विद्या चव्हाण यांनी सांगितला.
मोहित कंबोज महाठग“मोहित कंबोज म्हणजे ठग आहे. भाजपचा मनी सप्लायर आहे. त्याने मला जय श्रीराम केलंय. तर मी ही त्याला उत्तर दिलंय. हर हर महादेव, जय जय बजरंग बली तोड दे दुश्मन की नली, जय सियाराम! आम्ही रामाच्या आधी सितामय्याचं नाव घेतो. कारण आम्ही सच्चे हिंदु आहोत. आमचं हिंदुत्व ढोंगी नाही. त्यांचं हिंदुत्व ढोंगी आहे” , असं म्हणत विद्या चव्हाण यांनी मोहित कंबोज यांना प्रत्युत्तर दिलंय.