डोंगर पार करून बांगलादेशी आला मुंबईत... अन् बनला लखपती, मोईनउद्दिनची अचंबित करणारी घुसखोरी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 06:55 IST2025-01-02T06:54:54+5:302025-01-02T06:55:49+5:30

मुलालाही सौदी अरेबियाला पाठवले. त्यासाठी चार वेळा तो बांगलादेशला जाऊन आला. एवढेच नाही, तर त्याने मुंबईत वेळोवेळी मतदानही केले. 

A Bangladeshi came to Mumbai after crossing the mountains and became a lakhpati, Moinuddin's surprising infiltration | डोंगर पार करून बांगलादेशी आला मुंबईत... अन् बनला लखपती, मोईनउद्दिनची अचंबित करणारी घुसखोरी  

डोंगर पार करून बांगलादेशी आला मुंबईत... अन् बनला लखपती, मोईनउद्दिनची अचंबित करणारी घुसखोरी  

मुंबई : मुंबई किंवा महाराष्ट्रातच नव्हे; तर संपूर्ण देशातच बांगलादेशी घुसखोरांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत बांगलादेशी नागरिकांवरील कारवाई वाढत आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या कारवाईने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मुंबईतील मोईन हयात बादशाह शेख (५१) म्हणजे बांगलादेशचा मोईनउद्दिन गेली ३४ वर्षे मुंबईत राहिला. मुंबईत लखपती झाला. मुलीचा निकाह लावला. मुलालाही सौदी अरेबियाला पाठवले. त्यासाठी चार वेळा तो बांगलादेशला जाऊन आला. एवढेच नाही, तर त्याने मुंबईत वेळोवेळी मतदानही केले. 

मूळचा बांगलादेशातील चटगाव, नौखाली-समीर मुन्शी हाटचा रहिवासी असलेला मोईन १७ वर्षांचा असताना अवैधरीत्या भारतात आला होता. सीमेवरील जवानांची नजर चुकवून एजंटच्या मदतीने दोन हजारांत डोंगर पार करून तो सुरुवातीला मुंब्य्रात राहिला. तेथेच ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्शन कार्ड बनवून घेतले. १९९३ च्या दंगलीत त्याने पुन्हा बांगलादेश गाठले. वातावरण शांत झाल्यानंतर पुन्हा मुंबईत परतला. ठाणेकर बनलेला मोईन बनावट कागदपत्रांच्या आधारे मुंबईकर झाला. तो कफ परेड येथील आंबेडकर नगरमध्ये राहू लागला. मुलांना उर्दू आणि कुराण शिकवत होता. कफ परेड येथे तो एका बड्या हॉटेलमध्ये मौलाना म्हणून परदेशातून येणाऱ्या मुस्लिमांसोबत नमाजमध्ये सहभागी व्हायचा. याच कागदपत्रांच्या आधारे लोकसभा निवडणुकीत त्याने मतदानही केल्याची माहिती उघडकीस आली. चौकशीत तो महिन्याला ७० हजार ते एक लाख रुपये दलालाच्या मदतीने कुटुंबीयांना पाठवत होता.

१५ हजारांत सीमा पार 
-  मोईनच्या चौकशीतून उजेडात आलेली माहिती अशी : त्याने पूर्वी दोन हजारांत सीमा पार केली होती.
-  २०२१ मध्ये त्याला यासाठी १५ हजार मोजावे लागले. मुंबईतून  विमानाने कोलकाता, तेथून ट्रेनने मुर्शिदाबाद. पुढे खासगी वाहनाने तो सीमेजवळ पोहोचला. 
-  नंतर दलालांच्या मदतीने सीमेवरील जवानांची नजर चुकवून डोंगर पार करून तो बांगलादेशात गेला. 

पत्नीशी केलेल्या चॅटिंगमधून फुटले बिंग 
कफ परेड पोलिस ठाण्यातील एटीसी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार प्रशांत सावंत, धर्मपाल भामरे यांच्या पथकाने मोईनला अटक केल्यानंतर सुरुवातीला त्याने ‘तो मी नव्हेच’चा पवित्रा घेतला. भोसले यांनी त्याचा मोबाइल तपासताच पत्नीने काही कामानिमित्त त्याला बांगलादेशचे नॅशनल आयडी कार्ड  आणि जन्म दाखल्याची प्रत शेअर केल्याचे आढळले. ही कागदपत्रे एटीसी पथकाच्या हाती लागताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

Web Title: A Bangladeshi came to Mumbai after crossing the mountains and became a lakhpati, Moinuddin's surprising infiltration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.