Join us

‘तो’ दारूच्या आहारी जातोय...; युवा पिढीला व्यसनांपासून वाचविण्याचे यंत्रणांसमोर मोठे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2023 11:36 AM

मुंबई : युवा पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकत आहे. व्यसन आणि त्याचे दूरगामी परिणाम माहीत असूनही त्यापासून परावृत्त होण्याकडे आजच्या ...

मुंबई : युवा पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकत आहे. व्यसन आणि त्याचे दूरगामी परिणाम माहीत असूनही त्यापासून परावृत्त होण्याकडे आजच्या तरुणांचा कल नाही. एकदा व्यसन जडले की ते सुटणे अवघड असते. फक्त इच्छाशक्तीच्या बळावर दारू सुटू शकत नाही, त्याला योग्य प्रयत्नांची जोड, योग्य मार्गदर्शन तसेच योग्य औषधोपचारांची साथ लागतेच. मात्र, व्यसनाच्या विनाशकारी जाळ्य़ामध्ये अडकलेल्या युवा पिढीला वाचविण्याचे आव्हान यंत्रणांसमोर आहे.

पालकांनी काय काळजी घ्यावी ?  पालकांनी आपल्या पाल्यांच्या पालन-पोषणाकडे विशेष लक्ष द्यावे.   शिवाय, आपली अपत्ये दिवसभर कुठे असतात, काय करतात, याची माहिती त्यांना असावी.   पालकांनी अपत्यांशी मित्रत्वाचे नाते जोडावे.   याखेरीज, मुले व्यसनांच्या आहारी जात आहेत, असे लक्षात आल्यास व्यसनाचे दुष्परिणाम समजावून घेऊन त्यापासून परावृत्त करावे.   दारूचे मानवी शरीरामधील अनेक अवयवांवर दुष्परिणाम होतात.   त्याचबरोबर आरोग्यविषयक गुंतागुंतीच्या समस्याही निर्माण होतात.   व्यसनाधीनतेचा मानसिक, शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम समजावून सांगावा, आवश्यकता भासल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.

दररोज मद्यप्राशन करणाऱ्या व्यक्तीला सलग काही दिवस मद्य न मिळाल्यास त्याला ‘विड्रॉवल सिम्प्टम्स’चा सामना करावा लागतो. त्यामध्ये हात थरथरणे, अस्वस्थ वाटणे, श्वास फुलणे, उलट्या, चक्कर येणे, झोप न लागणे आणि विसरणे किंवा भ्रम होणे आदी लक्षणे दिसतात. एखादी व्यक्ती पूर्णतः मद्यावर अवलंबून असल्यास तिला मद्य न मिळाल्यास आभासही होतात. ‘विड्रॉवल सिम्प्टम्स’चा सामना करणाऱ्या व्यक्तीला ग्लुकोज किंवा ‘ओआरएस’चे पाणी प्यायला द्यावे. - डॉ. निवेदिता लोहिया, मानसोपचारतज्ज्ञ

कारणमीमांसा करून शोधावा मार्गव्यसनाधीनतेचे वय घटत असल्याने तरुणांशी संवाद अधिक महत्त्वाचा आहे. व्यसनाधीन तरुणाईला त्यापासून दूर करण्यासाठी आधी कारणांचा शोध घेतला पाहिजे. अनेकदा व्यसनाधीनतेसाठी संपन्नता, हलाखी, स्वभाव, दुःखे, निराशा, रिकामपणा, आपली जीवनदृष्टी, संगत वगैरे ही कारणे असतात. त्यामुळे तरुण पिढीतील प्रत्येकाची मनोवस्था ओळखून त्याप्रमाणे यावर मार्ग काढावा. अनेकदा पालकांशी साधलेल्या मोकळ्या संवादातून व्यसनाला आळा बसू शकतो, अशी अनेक उदाहरणे बघायला मिळतात. - डॉ. रंजना शाह, समुपदेशक

तरुण व्यसनाच्या आहारी का जातात ?पैशांचा गैरवापर, मार्गदर्शनाचा अभाव, उत्सुकता, संगत अशा काही कारणांमुळे व्यसनाधीनता जडताना दिसते. अनेक  व्यसनी व्यक्तीला मिळणारा दर्जा, फॅशन, काहीतरी व्यसन असावे, अशी भूमिका ठेवून व्यसन करत असल्याचे आढळले आहे.

टॅग्स :आरोग्य