मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर मोठी घटना घडण्याची शक्यता असल्याचा कॉल महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षात आल्याने खळबळ उडाली. याबाबत मुंबई पोलिसांना कळविण्यात आले असून त्यानुसार, गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.
महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला रविवारी रात्री एका व्यक्तीने कॉल केला होता. कॉल करणाऱ्या व्यक्तीने तो मुंबईहून गुजरातला जात असताना रेल्वेमध्ये चार ते पाच मुस्लिम प्रवाशांमध्ये उद्धव ठाकरेंबद्दल चर्चा सुरू असल्याचे ऐकले. हे मुस्लिम प्रवासी ऊर्दू भाषेत बोलत असल्याचा दावाही या व्यक्तीने केला. हे सर्वजण मुंबईतील मोहम्मद अली रोडवर भाडेतत्त्वावर राहणार आहेत.
यावेळी ठाकरे यांच्या घराबाहेर घटना घडणार असल्याचेही त्यांच्यात चर्चा झाल्याचे त्या व्यक्तीने सांगितले. या माहितीनंतर महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षाने तत्काळ याबाबतची माहिती मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली. या कॉलच्या आधारे पोलिसांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, प्राथमिक तपासात कॉल करणारी व्यक्ती रेल्वेतून प्रवास करत नव्हती, असे समजते. त्यामुळे हा खोटा कॉल असावा, असा कयास असून पोलिस संबंधित व्यक्तीचा शोध घेत आहेत.